साक्षीने इन्स्टाग्रामवर लिहलं आहे की, 'तू जे काही मिळवलं आहे त्याचा तुला गर्व असला पाहिजे. क्रिकेटला आपले सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल तुझं अभिनंदन. तुझ्या कर्तृत्वाचा आणि तुझ्यातील व्यक्तीचा मला अभिमान आहे. मला माहित आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करताना तू तुझ्या डोळ्यातील अश्रूंना थांबवलं असशील. भविष्यातील तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. #thankyoumsd #proud'.
धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कर्णधार विराट कोहलीने धोनीला ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर आज (15 ऑगस्टला) महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनी आयपीएल खेळत राहणार आहे. धोनीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली.
धोनीनं एक क्रिकेटर आणि एक कर्णधार या नात्यानं भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं आहे. 2007 सालचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक, 2011 सालचा वन डे विश्वचषक, 2012 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी, याच कालावधीत कसोटी क्रमवारीतला नंबर वन ही सारी कामगिरी म्हणजे कर्णधार म्हणून धोनीच्या यशाचा परमोच्च बिंदू होता. त्याच वेळी एक फलंदाज आणि तेही अखेरच्या षटकांत विजयी घाव घालणारा फलंदाज म्हणून धोनीचं कर्तृत्व खूप मोठं होतं. त्यानं 15 वर्षांच्या कारकीर्दीत 350 वन डे सामन्यांत भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्याच्या खात्यात 10 शतकं आणि 73 अर्धशतकांसह 10 हजार 773 धावा जमा आहेत. धोनीनं 98 ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये 37.60 च्या सरासरीनं 1617 फटकावल्या आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टीत त्याचा स्ट्राईक रेट तर तब्बल 126.13 आहे. ही सारी कामगिरी लक्षात घेऊनच धोनीला कॅप्टन कूल आणि मॅचफिनिशर या उपाधी त्याला मानानं बहाल करण्यात आल्या होत्या.