मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ न मिळाल्यामुळे निराशा वाटते. तेव्हा ती भावना समजण्यासारखी आहे. त्यांना पुन्हा अशी निराशा वाटू नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत, असं सचिन तेंडुलकरनं म्हटलं आहे.
तरुण भारत स्वप्ने आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेला आहे. तेच आपल्या यशाचे मुख्य बळ आहेत.मला खात्री आहे की, आपण सर्वजण यावर उपाय शोधून काढू, असा विश्वास सचिन तेंडुलकर यानं व्यक्त केला आहे.
सचिन तेंडुलकरच्या पोस्टचं मराठी भाषांतर
माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक तरुण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते.
त्यांनी मला सुरुवातीच्या काळातच एक महत्त्वाची शिकवण दिली होती: "अपयश आले तरी चालते, पण फसवणूक किंवा गैरमार्ग स्वीकारणे योग्य नाही. कधीही शॉर्टकट्स (सोपे पण चुकीचे मार्ग) घेऊ नका."
समाजातील जबाबदार नागरिक म्हणून, संस्कृती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जो समाज कष्टापेक्षा केवळ निकालांना अधिक महत्त्व देतो, तो समाज गुणवत्तेपेक्षा शॉर्टकट्सना प्राधान्य देतो.
आज जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ न मिळाल्यामुळे निराशा वाटते, तेव्हा ती भावना समजण्यासारखी आहे. त्यांना पुन्हा अशी निराशा वाटू नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
तरुण भारत स्वप्ने आणि ऊर्जेने ओतप्रोत भरलेला आहे. तेच आपल्या यशाचे मुख्य बळ आहेत. पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासक अशा समाजातील सर्व घटकांची ही मोठी जबाबदारी आहे की, त्यांनी तरुणांना प्रोत्साहित आणि उत्साही ठेवण्यासाठी आपापली भूमिका योग्यरित्या पार पाडावी.
आपल्याला अशी संस्कृती निर्माण करायला हवी जिथे कष्टाचे चीज होईल, प्रामाणिकपणाला प्रोत्साहन मिळेल आणि गुणवत्तेचा विजय होईल.
मला खात्री आहे की, आपण सर्वजण असे उपाय शोधून काढू ज्यामुळे आपल्या मुलांचे भविष्य अधिक बळकट होईल आणि त्यांच्या आकांक्षांचे जतन होईल.जय हिंद!
दरम्यान, हिंदी चित्रपट क्षेत्रातील अभिनेता सलमान खान यानं विद्यार्थ्यांनी आंदोलन संपवावं असं आवाहन केलं आहे. तर, सोनम वांगचुक यांनी देखील उपोषण सोडावं असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पेपर फोडणाऱ्यांवर कडक कारवाई करतील, असा उल्लेख सलमान खानच्या पोस्टमध्ये आहे.
