Cricket News | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदान गाजवताना दिसत आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सचिनने पुन्हा एकदा धडाकेबाज अर्धशतक साजरं केलं आहे. वेस्ट इंडिज लिजेंड्स विरोधात टॉस हारत इंडिया लिजेंड्स संघ मैदानात प्रथम फलंदाजी करायला उतरला. लिजेंड्स इंडियाने 3 विकेट्स गमावत 218 धावांचा डोंगर उभारला. सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिज लिजेंड्सला पराभूत करत इंडिया लिजेंड्सने फायनलमध्ये धडक मारली आहे.


सचिन तेंडुलकरने या सामन्यात 42 चेंडूंवर 65 धावांची दमदार खेळी केली. या खेळात सचिनने 6 चौके आणि तीन षटकार लगावले. सचिनसोबत युवराज सिंगही सामन्यात चमकला. युवराजने 49 धावांची नाबाद खेळी केली. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. सेहवागने पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 17 चेंडूत 35 धावांची खेळी केली. लिजेंड्स इंडियाची धावसंख्या 56 असताना पहिला धक्का बसला.


सेहवाग बाद झाल्यानंतर सचिन तेंडुलकरने मौहम्मद कैफच्या मदतीने लिंजेंड्स इंडियाची खेळी सुरु ठेवली. दोघांनी मिळून धावसंख्या 100 पार नेली. मोहम्मद कैफने 21 चेंडूत 27 धावांची खेळी केली. लिजेंड्स इंडियाची धावसंख्या 109 असताना मोहम्मद कैफ तंबूत परतला. 


लिजेंड्स इंडियाची धावसंख्या 140 असताना सचिन बाद झाला. सचिन बेस्टच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र त्यानंतर युसूफ पठान आणि युवराज सिंगने धडाकेबाज फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली. पठानने 20 चेंडूत 37 धावांची खेळी केली. टिनो बेस्टने दोन तर रेयान ऑस्टिनने एक विकेट घेतली. 


युवराजचे 7 चेंडूत 5 षटकार


लिजेंड्स इंडियाकडून खेळताना युवराजने शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये पाच षटकार लगावले. सिंक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजने तशीच कामगिरी केली. युवराजने महेंद्र नागामुट्टूच्या पहिल्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार लगावले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा एक षटकार लगावला. त्यानंतर सुलेमान बेनच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दोन षटकार लगावले.