Arjun Tendulkar Sania Chandhok Engagement : क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांनी अखेर आपल्या मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अर्जुन तेंडुलकर आणि सानिया यांच्या साखरपुड्याच्या बातम्या सोशल मीडियावर जोरात फिरत होत्या. मात्र तेंडुलकर कुटुंबाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता स्वतः मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी या नात्याला दुजोरा दिला आहे.
सचिनची अधिकृत पुष्टी
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरील आस्क मी एनीथिंग सेशनमध्ये जेव्हा त्यांना अर्जुनच्या साखरपुड्याबद्दल विचारले गेले, तेव्हा सचिन हसत म्हणाले की,'होय, अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा झाला आहे. संपूर्ण कुटुंब या निमित्ताने आनंदी आणि उत्साहित आहे.' आम्ही तुम्हाला सांगतो की, बुधवारी 13 ऑगस्ट 2025 रोजी अर्जुन आणि सानियाने एकमेकांच्या हातात अंगठ्या घालून हा नवा प्रवास सुरू केला. आता त्यांच्या लग्नाच्या तारखेची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
कोण आहे सानिया चंडोक?
सानिया चांडोक ही देशातील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब पंचतारांकित इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल, ब्रुकलिन क्रीमरी आणि ग्रॅव्हिस गुड फूड्स सारख्या मोठ्या व्यवसायांशी संबंधित आहे. पण, सानियाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ती मुंबईत मिस्टर पॉज नावाचे एक प्रीमियम पेट सलून, स्पा आणि स्टोअर चालवते. सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे आणि ती अर्जुनची बहीण सारा तेंडुलकरच्या खूप जवळची आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो अर्जुन तेंडुलकर...
25 वर्षीय अर्जुन तेंडुलकर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. तसेच तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. मात्र आयपीएल 2025 हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेला अर्जुन स्वतःला सिद्ध करण्यासाठी सातत्याने मेहनत करत आहे. त्याने काही काळ युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले आहे. गोलंदाजीसोबतच अर्जुनची फलंदाजीची क्षमता भविष्यात सर्वांना आश्चर्यचकित करू शकेल, अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.
हे ही वाचा -