India Legends Road Safety Series 2022 :  इंडिया लिजेंड्सने (India Legends) रोड सेफ्टी स्पर्धेत 2022 (Road Safety Series 2022) चे विजेतेपद पटकावले आहे. फायनलमध्ये इंडिया लिजेंड्सच्या संघानं श्रीलंका लिजेंड्सचा 33 धावांनी पराभव केला आहे. या अंतिम सामन्यात नमन ओझाने (Naman Ojha) दमदार खेळी केली. ओझाने इंडिया लिजेंड्ससाठी नाबाद शतक झळकावले आहे. विजयानंतर कर्णधार सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) संघातील सर्व खेळाडूनं जल्लोष साजरा केला. दरम्यान, इरफान पठाणने सचिन तेंडूलकरचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हारल होत आहे.


सचिन तेंडूलकरने केलं जोरदार सेलिब्रेशन


श्रीलंका लिजेंड्सचा पराभव केल्यानंतर इंडिया लिजेंड्स संघानं जोरदार जल्लोष केला. या जल्लोषाचे व्हिडीओ इरफान पठाणने शेअर केला आहे. शेअर केलेला व्हिडीओ हा ड्रेसिंग रुममधला आहे. या व्हिडीओमध्ये इरफान पठाण हा सचिन तेंडूलकर आणि युसूफ पठाणसोबत दिसत आहे. या दोघांसह संपूर्ण टीम उत्साहात दिसत आहे. व्हिडिओमध्ये सचिन तेंडूलकर जोरदार सेलिब्रेशन करताना दिसत आहे. ट्विटरवर इरफान पठाणने शेअर केलेल्या या व्हिडिओला सुमारे 4 हजार लोकांनी लाईक केले आहे. तर सुमारे 18 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.


 






इंडिया लिजेंड्स संघाच्या 20 षटकांत 195 धावा 


श्रीलंका लिजेंड्स विरोधात प्रथम फलंदाजी करताना इंडिया लिजेंड्स संघानं 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा केल्या होत्या. यादरम्यान नमन ओझानं 71 चेंडूत नाबाद 108 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर विनय कुमारने 21 चेंडूत 36 धावा केल्या. युवराज सिंगने 19 आणि इरफान पठाणने 11 धावांचे योगदान दिले. या सर्वांच्या योगदानाच्या बळावर  इंडिया लिजेंड्स संघानं 20 षटकांत 195 धावा केल्या होत्या.


श्रीलंका लिजेंड्स संघ सर्वबाद 162 धावा


इंडिया लिजेंड्स केलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंका लिजेंड्स संघ 18.5 षटकांत सर्वबाद 162 धावा करू शकला.  श्रीलंका लिजेंड्स संघाकडून इशान जयरत्नेने सर्वाधिक 51 धावा केल्या. त्याने 22 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. यादरम्यान विनय कुमारने इंडिया लिजेंड्ससाठी शानदार गोलंदाजी केली. त्याने 3.5 षटकात 38 धावा देत 3 बळी घेतले. अभिमन्यू मिथुनने 2 बळी घेतले.