Sachin Tendulkar Birthday : क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याने 24 एप्रिल रोजी 50 वा वाढदिवस साजरा केला. सचिन तेंडुलकर याने अतिशय साधेपणाने वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तेंडुलकर कोकणात गेला होता. सहकुटुंब त्याने साधेपणाने वाढदिवस साजरा केला होता. आज सचिन तेंडुलकर याने वाढदिवसादिवशी काढलेला एक फोटो पोस्ट केला आहे. मराठमोळ्या संस्कृतीची ओळख असलेला फोटो पोस्ट करत सचिन याने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. या फोटोमध्ये सचिन तेंडुकलकर, पत्नी अंजली आणि मुलगी सारा दिसत आहेत.


सचिन तेंडुलकर फुकणीने चुलीचा जाळ लावत असल्याचे दिसतेय. चुलीवरील भांड्यात अंजली काहीतरी करत असल्याचे दिसतेय. त्याशिवाय सोबत साराही आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव पडत आहे. सचिन तेंडुलकर याने फोटो पोस्ट करताना खास पोस्टही टाकली आहे. यामध्ये त्याने म्हटलेय की,  "तुम्ही प्रत्येक दिवशी अर्धशतक झळकावू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा त्याला सर्वात जास्त महत्त्व असते. अलीकडेच एका शांत गावात माझ्या टीमसोबत, माझ्या कुटुंबासोबत 50 वा वाढदिवस साजरा केला. अर्जुन आयपीएलमध्ये व्यस्त असल्याने त्याची खूप आठवण येत आहे." 


मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 24 एप्रिल रोजी आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले.  सचिन आपला 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी  कोकणात गेला होता. त्याने भोगवे येथील समुद्रकिनारी साध्या पद्धतीने कुटुंबासोबत वाढदिवस साजरा केला.  अर्जुन तेंडुलकर आयपीएलमध्ये व्यस्त असल्यामुळे कोकणात गेला नव्हता. सचिनने कुटुंबियांसह मित्रमंडळींनी गाण्यांच्या मैफिलीसह आनंद लुटला. सचिनने आपला पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड केली. सचिनने माचली रिसॉर्ट फिरून पाहिले आणि समाधान व्यक्त केले. कुटुंबिय व सहकाऱ्यांसह त्याने गप्पा-गाण्यांची मैफिल रंगविली. दिवसभर सचिन मित्रांच्या गराड्यात गप्पांमध्ये रमला होता.






"भरलेला बांगडा, कोळंबी फ्राय, 'माशाचा मालवणी तिखला,' कोंबडी रस्सा, वडे-सागोती, गोलमा अशा अस्सल झणझणीत मत्स्याहारी आणि मांसाहारी मालवणी पदार्थांवर यथेच्छ ताव मारत 'क्रिकेटच्या देवा'ने अर्थात खवैय्या सचिन तेंडुलकरने या सुग्रास भोजनाला दिलखुलास दाद दिली. परुळे येथील माचली रिसॉर्टला सचिन, पत्नी अंजली तेंडुलकर, कन्या सारा तेंडुलकर व सचिनच्या मित्रांनी भेट दिली. आपल्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त भोगवे दौऱ्यावर आलेल्या सचिनने खास मालवणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला. शाकाहारी पदार्थांमध्ये आमरसासह हापूस आंबे तसेच कैरीचे लोणचे, कैरीची चटणी, सांगितले. कंद मुळाची भाजी, काजू-शहाळ्याची भाजी, भात, सोलकढी, निरफणसाची कापे, बोंडू रायता अशा पदार्थांचीही यावेळी रेलचेल होती. सचिनचे कुटुंब आणि मित्र मिळून सुमारे तीसजणांनी या पंक्तीत एकत्र जेवण घेतले.