नवी दिल्ली : यंदाच्या विश्वचषक स्पर्धेचा (Cricket World Cup 2023) विजयी संघ म्हणून प्रबळ दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची वादळी सुरुवात केली आहे. दिल्लीत होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली आहे. आफ्रिकेच्या ए़डन मार्करमने (Aiden Markram) वादळी खेळी साकारली. मार्करमने विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वेगवान शतक झळकवण्याचा विक्रम (Aiden Markram World Record) केला आहे. त्याने अवघ्या 49 चेंडूत शतक साकारले. त्याच्या या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका संघाने 50 षटकात 5 बाद 428 धावांचा डोंगर उभारला आहे.
मार्करमने 54 चेंडूत 196.30 च्या स्ट्राईक रेटने 106 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकारांचा वर्षाव केला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या मार्करमने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. श्रीलंकेचे गोलंदाज त्याच्यासमोर पूर्णपणे हतबल झाल्याचे दिसून आले.
मार्करम आज आयर्लंडचा फलंदाज केविन ओब्रायन याचा विक्रम मोडला. केविनने 2011 मधील वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरोधात वेगवान शतक झळकावले होते.
क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सचाही समावेश आहे. 2015 च्या विश्वचषकात डिव्हिलियर्सने वेस्ट इंडिजविरुद्ध 52 चेंडूत शतक पूर्ण केले होते. या यादीत आधी डिव्हिलियर्स तिसऱ्या क्रमांकावर होता, पण आता तो चौथ्या क्रमांकावर आला आहे.
विक्रम रचणारा सामना...
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 5 गडी गमावून 428 धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विश्वचषकात प्रथमच तीन फलंदाजांनी एका डावात शतके झळकावली. दक्षिण आफ्रिकेसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉक (100), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन (108) आणि एडन मार्करम (106) यांनी शतक झळकावत श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढले. विश्वचषकाच्या एका डावात सर्वाधिक 59 चौकार ठोकण्याचा विक्रमही आज नोंदवण्यात आला.
डी कॉकने 84 चेंडूत 100 धावांची खेळी साकारली. 12 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपली खेळी सजवली. तर डुसेनने 110 चेंडूत 108 धावांची खेळी केली. डुसेनने 13 चौकार आणि 2 षटकार लगावले. यानंतर अॅडम मार्करामने सर्वात वेगवान शतक झळकावले.
विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारे टॉप-5 फलंदाज
1. 49 चेंडू - एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध श्रीलंका - 2023 विश्वचषक
2. 50 चेंडू - केविन ओब्रायन (आयर्लंड) विरुद्ध इंग्लंड - विश्वचषक 2011
3. 51 चेंडू- ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध श्रीलंका - विश्वचषक 2015
4. 52 चेंडू- एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध वेस्ट इंडिज - विश्वचषक २०१५
5. 57 चेंडू- इऑन मॉर्गन (इंग्लंड) विरुद्ध अफगाणिस्तान- विश्वचषक 2019.