Ruturaj Gaikwad Record: शाहजीबापू पाटील यांच्यामुळे महाराष्ट्रात फेमस झालेल्या गुवाहाटीमध्ये आज पुन्हा एकदा झाडी अन् डोंगराचे दर्शन झालेय. तेही मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडच्या चौकार आणि षटकारामुळे.. तिसरा टी 20 सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात तीन विकेटच्या मोबदल्यात 222 धावांचा डोंगर उभारला. ऋतुराज गायकवाड याने नाबाद 123 धावांची खेळी केली. ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतला. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा ऋतुराज गायकवाड पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना यासारख्या दिग्गजांनाही ऑस्ट्रेलियाविरोधात टी 20 मध्ये शतक ठोकता आले नव्हते.
सुरुवातीला संयमी खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाडने अखेरच्या टप्प्यात आक्रमक रुप धारण केले. ऋतुराज गायकवाडने 57 चेंडूमध्ये 215 च्या स्ट्राईक रेटने 123 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने सात गगनचुंबी षटकार मारले तर 13 खणखणीत चौकार लगावले. ऋतुराजच्या वादळात ऑस्ट्रेलियाचे सर्वच गोलंदाज फेल ठरले. त्याने प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. ऋतुराज गायकवाड याने टी 20 करियरमधील पहिले शतक ठोकले. ऋतुराज गायकवाडने पहिल्या 21 चेंडूत फक्त 21 धावा केल्या होत्या. मैदानावर जम बसल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढली. त्याने पुढील 31 चेंडूत 81 धावांचा पाऊस पाडला. मॅक्सवेलच्या अखेरच्या षटकात तर तब्बल 30 धावा वसूल केल्या.
ऋतुराज गायकवाडने सूर्यकुमार यादव याच्यासोबत 47 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली. यामध्ये ऋतुराज गायकवाडने 18 चेंडूत 17 धावा केल्या होत्या. पण कर्णधार माघारी परतल्यानंतर ऋतुराजने सुत्रे आपल्या हातात घेतली. ऋतुराजने तिलक वर्मासोबत भारताची धावसंख्या वागाने वाढवली. ऋतुराज आणि तिलक वर्मा यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी 59 चेंडूत अभद्य अशी 141 धावांची भागिदारी झाली. यामध्ये ऋतुराज गायकवाडचे योगदान 101 धावांचे होते. ऋतुराजच्या वादळात ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फिकी पडली होती.