IND vs SA 1st Unofficial ODI Highlights : राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर गुरुवारी खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या अनऑफिशियल वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंडिया-अ संघाने दक्षिण आफ्रिका-अ संघावर 4 विकेटने थरारक विजय मिळवला. 286 धावांचे कठीण आव्हान टीमने शेवटच्या षटकात पार करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
टीम इंडियाने शेवटच्या षटकात सामना जिंकला
इंडिया-अ संघाच्या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे ऋतुराज गायकवाड. उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत त्याने 129 चेंडूत 117 धावांची दणदणीत खेळी साकारली. या खेळीत त्याने 12 चौकारांची आतषबाजी केली. सलामीवीर अभिषेक शर्माने 31 धावांची चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार तिलक वर्माने 39 धावा करून डावाला मजबुती दिली. अखेरच्या टप्प्यात नीतीश रेड्डीने फिनिशरची धमाकेदार भूमिका बजावत 26 चेंडूत 37 धावा ठोकल्या. त्याने एक षटकार आणि तीन चौकार लगावून सामना इंडिया-अ संघाच्या बाजूला खेचला. शेवटी निशांत सिंधूने 29 धावांवर नाबाद राहून संघाला विजय मिळून दिला. दक्षिण आफ्रिका-एकडून ब्योर्न फोर्टुइन, ओटनील बार्टमॅन आणि तियान वॅन व्युरेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
दक्षिण आफ्रिका-अ संघाची खराब सुरुवात; पण....
यापूर्वी नाणेफेक हरून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका-एची अवस्था 53 धावांत 5 गडी बाद अशी झाली होती. स्कोर 150 च्याही पुढे जाईल का, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण त्यानंतर डेलानो पोटगीटर, डायन फॉरेस्टर आणि ब्योर्न फोर्टुइन यांनी सामन्याला वेगळ्याच वळणावर नेले. पोटगीटरने 105 चेंडूत 90 धावांची जबरदस्त खेळी केली. त्यात 10 चौकार आणि एक षटकार होता. त्याने फॉरेस्टरसोबत सहाव्या विकेटसाठी 113 धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. फॉरेस्टरनेही 77 धावा करून साथ दिली. अखेरीस फोर्टुइनने 58 धावा झळकावत टीमला 285 धावांपर्यंत नेले. इंडिया-एकडून हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांनी दोन-दोन विकेट घेतल्या.
दुसरा सामना 16 नोव्हेंबरला
मालिकेतील दुसरा सामना देखील राजकोटमध्येच 16 नोव्हेंबरला रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका-अ पुनरागमनासाठी उतरेल, तर इंडिया-अ मालिकाच जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे.
टीम इंडिया अ संघाची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, तिलक वर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, निशांत सिंधू, हर्षित राणा, विपराज निगम, अर्शदीप सिंग, प्रसीद्ध कृष्णा.
दक्षिण आफ्रिका अ संघाची प्लेइंग इलेव्हन
रिवाल्डो मूनसामी, रुबिन हर्मन (यष्टीरक्षक), जॉर्डन हर्मन, मार्कस अकरमन (कर्णधार), सिनेथेम्बा केशिले, डायन फॉरेस्टर, डेलानो पॉटगीटर, ब्योर्न फोर्टुइन, टियान व्हॅन वुरेन, त्शेपो मोरेकी, ओथनील बार्टमन.
हे ही वाचा -