Rohit Sharma & Ishan Kisan Viral Video : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात म्हणजेच अहमदाबादमध्ये ईशान किशनच्या (Ishan Kishan) कसोटी सामन्यातील पदार्पणाबद्दल अनेक अंदाज बांधले जात होते, पण तसं झालं नाही. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात ईशान किशनला पदार्पण करता आलं नाही, पण या मॅचवेळी त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील ईशान किशन आणि रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भर मैदानात ईशानच्या थोबाडीत मारणार होता रोहित शर्मा?
कसोटी सामन्यामध्ये पदार्पण करता आलं नसलं तरी ईशान किशनला यावेळी पाणी वाटपाची जबाबदारी देण्यात आली होती. ईशान पाणी देण्यासाठी सामन्यादरम्यान मैदानात आला होता. खेळाडूंना पाणी दिल्यानंतर ईशान रोहितच्या हातातील बाटली घेऊन मैदानाबाहेर पळत होता, मात्र त्याच्या हातातून बाटली पडली. त्यानंतर रोहितच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. भर मैदानात ईशान किशनच्या थोबाडीत मारणार होता रोहित शर्मा नक्की काय झालं ते जाणून घ्या.
पाहा व्हायरल व्हिडीओ :
ईशान किशन रोहित शर्माचा मार खाण्यापासून थोडक्यात बचावला. ईशानने पाण्याची बॉटल मैदानावर पाडल्यावर रोहित शर्मा मस्करीत त्याला मारायची अॅक्शन केली. याचा व्हिडीओ सध्या तुफान चर्चेत आहे.
ईशान किशनचं कसोटीत पदार्पण कधी होणार?
ईशान किशनच्या कसोटी पदार्पणाबद्दल बोलताना, अहमदाबाद सामना सुरु होण्यापूर्वी, अनेक क्रिकेट तज्ज्ञांचा असा अंदाज होता की, ईशान किशनला मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात त्याच्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळू शकते. पहिल्या तीन सामन्यांमध्ये भारत चांगली फलंदाजी करु शकला नाही त्यामुळे केएस भरतच्या जागी यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन मैदानावर येण्याची शक्यता वर्तवली जात होती.
चौथ्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीला केएस भरतने उमेश यादवच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडचा एक सोपी कॅच सोडली, त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आणि क्रिकेट तज्ज्ञांनीही ईशान किशनची बाजू मांडण्यास सुरुवात केली. मात्र, जेव्हा कर्णधार रोहित शर्माला अहमदाबाद कसोटी सामन्यापूर्वी ईशान किशनच्या पदार्पणाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, जेव्हाही ईशानला संधी मिळेल तेव्हा ती पूर्ण वेळ मिळेल. केवळ एक-दोन सामन्यांमध्ये त्याला संधी देऊन आम्ही त्याला बसवू, असं होणार नाही. ते योग्यही ठरणार नाही.
पहिल्या दिवशीच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावून 255 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा 251 चेंडूत 104 धावा केल्यानंतर क्रीझवर नाबाद आहे आणि कॅमेरुन ग्रीन 64 चेंडूत 49 धावा केल्यानंतर नाबाद आहे.