Rohit Sharma Mumbai Ranji Trophy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने कडक शब्दात खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सांगितले. यानंतर, रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांच्यासह अनेक खेळाडूंनी रणजी ट्रॉफीच्या पुढील फेरीत आपापल्या संघांसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली. रणजी ट्रॉफीचे सामने 23 जानेवारीपासून सुरू होणार आहेत, ज्यासाठी सराव सुरू झाला आहे.
मुंबईकडून खेळणारा यशस्वी बुधवार 15 जानेवारी रोजी संघाच्या शिबिरात सामील झाला आणि सरावाला सुरुवात केली. रोहित शर्मा मुंबईकडून खेळेल की नाही याची अधिकृत माहिती नाही, परंतु काही दिवसांपूर्वी तो मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रणजी संघासोबत सराव करताना दिसला. मुंबईचा सामना जम्मू आणि काश्मीरशी होणार आहे. यशस्वी जैस्वालने या सामन्यासाठी खेळण्यास सहमती दर्शवली आहे, त्यामुळे त्याचे खेळणे निश्चित आहे. म्हणजे जर रोहित आणि यशस्वी जैस्वाल दोघेही संघात असतील तर ते दोघेही जम्मू आणि काश्मीरविरुद्ध मुंबईसाठी डावाची सुरुवात करू शकतात.
रोहित-यशस्वी देणार सलामी?
भारताला 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत सहभागी व्हायचे आहे आणि यशस्वी जैस्वाल टी-20 संघाचा भाग नाही, त्यामुळे तो रणजी सामना खेळू शकतो. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि तो इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय संघाचा भाग असेल. अशा परिस्थितीत तो पण रणजी सामना खेळू शकतो, ज्यामध्ये खेळणे बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी अनिवार्य केले आहे.
जर रोहित शर्मा मुंबईच्या रणजी संघात खेळला, तर रोहित आणि यशस्वी जम्मू आणि काश्मीरविरुद्ध या संघासाठी सलामी करतील, तर सिद्धेश लाड तिसऱ्या क्रमांकावर असेल तर श्रेयस अय्यर या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो, संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो. आकाश आनंद संघात यष्टीरक्षक असू शकतो तर शार्दुल ठाकूर या संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसेल.
जम्मू आणि काश्मीर विरुद्ध मुंबईचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, आकाश आनंद (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, एम जुनेद खान, मोहित अवस्थी, हिमांशू वीर सिंग.
हे ही वाचा -