नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पराभवामुळं इतकं दु:ख झालेलं की निवृत्ती घ्यायचा विचार मनात आलेला, असं रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्मानं म्हटलं की ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पराभवामुळं इतका खचलो होतो की क्रिकेटमधून कायमची निवृत्ती घेण्याचा विचार आलेला. मात्र, रोहित शर्माच्याच नेतृत्त्वात भारतानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर मार्च 2025 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं.
Rohit Sharma : रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मानं भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दमदार फलंदाजी केली होती. त्यानं 11 मॅचमध्ये 54.27 च्या सरासरीनं 597 धावा केल्या होत्या. मात्र, अंतिम फेरीच्या लढतीत भारताचे फलंदाज अपयशी ठरले होते.
भारताचा संघ अंतिम फेरीच्या सामन्यात 240 धावा करु शकला होता. त्यानंत ऑस्ट्रेलियानं या मॅचमध्ये सहजपणे विजय मिळवला होता. रोहित शर्मान म्हटलं की तो काळ त्याच्यासाठी खूप अवघड होता. 2022 मध्ये कर्णधार झाल्यानंतर पहिलं ध्येय वनडे वर्ल्ड कप जिंकणं हे होतं.
रोहित शर्मा म्हणाला की सर्व लोक दु:खी होते. जे घडलं होतं, त्यावर विश्वास बसत नव्हता. व्यक्तिगत माझ्यासाठी खूप अवघड काळ होता. कारण मी त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वस्व पणाला लावलं होतं. फक्त दोन तीन महिने अगोदर नव्हे तर जेव्हा 2022 मध्ये कर्णधार पद स्वीकारलं होतं तेव्हापासून असं रोहितनं म्हटलं.
रोहित शर्मा पुढं म्हणाला की, अहमदाबादमध्ये झालेल्या पराभवानंतर मला प्रामाणिकपणे वाटलं की मला आता आणखी क्रिकेट खेळायचं नाही. त्या वर्ल्ड कपमध्ये सर्वस्व झोकून देऊन खेळलो होतो. जेव्हा पराभव झाला होता तेव्हा मला वाटलं की माझ्या शरिरात आणि डोक्यात काही राहिलं नाही, मला वाटलं की खेळानं माझी सर्व ऊर्जा हिरावून घेतली, असं रोहित शर्मानं म्हटलं.
दरम्यान, रोहित शर्मानं भारताला 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्त झाला आहे. रोहित सध्या भारताकडून वनडे क्रिकेट खेळतोय.