दुबई : रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मोहिमेची सुरुवात विजयानं केली आहे. भारतानं बांगलादेशला 6 विकेटनं पराभूत केलं. बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 228 धावा केल्या होत्या. भारतानं हे आव्हान 4 विकेट गमावून आणि 21 बॉल बाकी ठेवत पूर्ण केलं. भारताच्या विजयाचे हिरो शुभमन गिल आणि मोहम्मद शमी ठरले. मात्र, या मॅचमध्ये सर्वाधिक चर्चा रोहित शर्मानं सोडलेल्या कॅचची झाली. रोहित शर्मानं मॅच संपल्यानंतर सुटलेल्या कॅचवर स्पष्टीकरण देत अक्षर पटेलला डिन्नरची ऑफर दिली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
रोहित शर्मानं सुटलेल्या कॅचवर देखील मॅच संपल्यानंतर भाष्य केलं. मी त्याला उद्या डिन्नरला घेऊन जाईन, मी तो कॅच घ्यायला हवा होता, तो सोपा कॅच होता, असं रोहित शर्मानं म्हटलं. रोहित शर्मानं अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कॅच सोडला होता. त्यामुळं अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली होती. याशिवाय बांगलादेशला मॅचमध्ये कमबॅक करण्याची संधी देखील मिळाली. रोहित शर्मानं ज्या जाकर अलीचा कॅच सोडला त्यानं 68 धावा केल्या. रोहित शर्मानं अक्षर पटेलची मैदानावरच हात जोडून माफी देखील मागितली होती.
रोहित शर्मानं शुभमन गिलच्या शतकी खेळीवर देखील भाष्य केलं. आम्हाला शुभमन गिलचा क्लास काय आहे ते माहिती आहे. आजच्या खेळीनं आम्हाला आश्चर्य वाटलं नाही. शुभमन गिल किती प्रतिभावान आहे, हे माहिती आहे, असं रोहित शर्मानं म्हटलं.
दुबईतील या सामन्यात बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय महागात पडला. बांगलादेशनं 35 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. तौहीद ह्रदय आणि जाकिर अली या दोघांनी 154 धावांची भागिदारी कत बांगलादेशचा डाव सावरला.तौहीदनं शतक केलं. तर, जाकिर अलीनं 68 धावा केल्या.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं 5 तर हर्षित राणानं 3 आणि अक्षर पटेलनं 2 विकेट घेतल्या.
228 धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं चांगली सुरुवात करुन दिली. शुभमन गिलनं नाबाद 101 धावा केल्या. यामध्ये त्यानं 9 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहित शर्मानं या मॅचमध्ये 41 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 41 धावा केल्या. केएल राहुल आणि शुभमन गिल यांच्या 87 धावांच्या भागिदारीमुळं भारतानं विजय मिळवला. आता भारताचा पुढचा सामना पाकिस्तान विरुद्ध 23 फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्याकडे भारतातील कोट्यवधी चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
इतर बातम्या :