Rohit Sharma On T20 World Cup 2024 : भारतीय संघाने नुकताच अफगाणिस्तानचा सुपडासाफ केला. भारताने अफगाणिस्तानचा 3-0 च्या फराकने दारुण पराभव केला. टी 20 विश्वचषकाआधी भारताची अखेरची टी20 मालिका होती. त्यामुळे याकडे भारतीय क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले होते. या मालिकेतूनच भारताच्या टी 20 विश्वचषक संघाची निवड होणार असा अंदाज वर्तवला जात होता. बेंगलोर येथे झालेल्या टी20 सामन्यानंतर रोहित शर्माने केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. टी 20 विश्वचषकात कुणाला संधी मिळणार? भारताची प्लेईंग 11 कशी असेल? यासंदर्भात रोहित शर्माला प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर रोहितनं दिलेले उत्तर सध्या चर्चेत आहे. 


काय म्हणाला रोहित शर्मा, का होतेय इतकी चर्चा?


तिसऱ्या टी 20 सामन्यात रोमांचक विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने युवा खेळाडूंचं कौतुक केले. पण त्याचवेळी भारताच्या टी 20 विश्वचषकातील संघाबाबत उत्तर देताना दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे. रोहित शर्मा म्हणाला की, टी 20 विश्वचषकासाठी अद्याप 15 जणांच्या चमूची निवड करण्यात आलेली नाही. पण 8-10 खेळाडूंचं स्थान जवळपास निश्चित आहे. खेळपट्टी आणि तेथील परिस्थिती पाहूनच प्लेईंग 11 ची निवड केली जाईल. वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या संथ आहेत, त्यानुसार प्लेईंग 11 ची निवड करावी लागेल. याबाबत कोच राहुल द्रविडसोबत माझी चर्चा झाली आहे.


अफगाणिस्तानविरोधात तिसऱ्या टी 20 सामन्यात काही खेळाडू प्लेईंग 11 मध्ये नव्हते. ते संघात का नव्हते? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण प्रत्येकाला खूश आणि संतुष्ट करु शकत नाही, असे रोहित शर्मा म्हणाला. 


सबको खुश रखना आसान नहीं... नेमका काय म्हणाला रोहित शर्मा?


सबको खुश रखना आसान नहीं, हे माझ्या कर्णधारपदामध्ये ही गोष्ट मी चांगल्या पद्धतीने शिकलोय, असे रोहित शर्मा म्हणाला. तुम्ही सर्व 15 खेळाडूंना खूश नाही ठेवू शकत... आपल्याला फक्त 11 खेळाडूंची निवड करायची आहे. खेळतात 11 खेळाडू पण चार खेळाडू बेंचवर असतात. सर्वजण बेंचवर बसणाऱ्या खेळाडूबद्दल विचारतात.. त्याशिवाय बेंचवर असणारे खेळाडूही मी का खेळत नाही, असे विचारतात, असे रोहित शर्मा म्हणाला. 


रोहितचं पाचवे शतक- 



कठीण परिस्थितीमध्ये रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. पण बेंगलोरच्या मैदानात रोहित शर्माने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठोकले. टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही. रोहित शर्माने अफगणिस्तानच्या सर्वच गोलंदाजांचा समाचार घेतली. रोहित शर्माने 69 चेंडूमध्ये नाबाद 121 धावांची खेळी केली. यामध्ये आठ षटकार आणि 11 चौकारांचा समावेश आहे.