नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतानं (India) टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं. भारतानं तब्बल 17 वर्षानंतर विजेतेपद मिळवलं. भारताच्या या विजयानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडिया झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर रवाना झाली होती. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडनं झिम्बॉब्वेला 4-1 असं पराभूत केलं. भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत तीन टी 20 सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरची देखील कोच म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, (Virat Kohli) रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. त्यामुळं रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हे श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सहभागी होणार का हे पाहावं लागेल.
रोहित शर्मा श्रीलंकेत वनडे मालिकेत खेळणार?
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरनं सर्व खेळाडूंना तिन्ही प्रकारचं क्रिकेट खेळण्यासाठी तयार राहावं लागेल, असं म्हटलं. मात्र, यातून रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना बीसीसीआयकडून सूट देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, रोहित शर्मानं ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्द एकदिवसीय सामन्यात खेळण्यासंदर्भात संकेत देण्यात आल्याची माहिती आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय सामने कमी खेळणार आहे. त्यामुळं रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळू शकतो, अशी शक्यता आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. हे सर्व सामने कोलंबोत होणार आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकतो. सध्या रोहित शर्मा अमेरिकेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी आयोजित करण्यात आलेली निवड समितीची बैठक देखील लांबणीवर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळं रोहित शर्मा लवकरच तो श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध आहे की नाही यासंदर्भातील माहिती बीसीसीआयला देऊ शकतो.
विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना श्रीलंका दौऱ्यासाठी आराम देण्यात आल्याची माहिती आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर बांगलादेश आणि न्यूझीलँड दौऱ्यावेळी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांची कसोटी मालिकेत भूमिका महत्त्वाची असणार आहे. त्यासाठी दोघांना विश्रांती देण्यात आलेली आहे. दरम्यान, विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यानं श्रेयस अय्यरला टीम इंडियाच्या वनडे संघात पुन्हा स्थान दिलं जाऊ शकतं.
संबंधित बातम्या :