India Vs South Africa : दक्षिण आफ्रिकेनं बॉक्सिंग डे कसोटीवर वर्चस्व मिळवलेय. भारताला पहिल्या डावात झटपट तंबूत धाडल्यानंतर आफ्रिकेने 408 धावांचा डोंगर उभारला. आफ्रिकेने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 163 धावांची आघाडी मिळाली. आफ्रिकेच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल स्वस्तात तंबूत परतले आहेत. रोहित शर्माला दुसऱ्या डावातही कगिसो रबाडा याने तंबूचा रस्ता दाखवला.


बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात रोहित शर्माला लौकिकास साजेशी कामगिरी करत आली नाही. दोन्ही डावात रोहित शर्माची शिकार आफ्रिकेच्या कगिसो रबाडा याने केली. भारतीय संघाला मोठ्या खेळीची गरज असताना दोन फलंदाज लवकर तंबूत परतले. त्यामुळे आता टीम इंडियाची अडचण वाढली आहे. अनुभवी विराट कोहली आणि युवा शुभमन गिल सध्या मैदानावर आहेत. विराट कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. 29 धावांत भारताने दोन विकेट गमावल्या आहेत. विराट कोहली आणि शुभमन गिल सध्या किल्ला लढवत आहेत. 







पहिल्या डावातही भारतीय संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. केएल राहुल याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नव्हती. कगिसो रबाडा याने भारताच्या महत्वाच्या पाच फलंदाजांना तंबूत झाडले होते. त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांचाही समावेश होता. आता दुसऱ्या डावात टीम इंडिया कसा पलटवार करणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.










आफ्रिकेची  163 धावांची आघाडी


दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 408 धावांवर आटोपला.  दक्षिण आफ्रिकेकडे 163 धावांची आघाडी आहे. यजमान संघाकडून डीन एल्गरने सर्वाधिक 185 धावा केल्या. याशिवाय मार्को जानसेन 84 धावा करून नाबाद माघारी परतला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 बळी घेतले. मोहम्मद सिराजने 2 बळी घेतले. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी अश्विन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.  


राहुलचे स्फोटक शतक  


दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने आठ विकेट्सवर 208 धावांवरून डावाला सुरुवात केली. मात्र, दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या  सत्रातच भारतीय संघ 245 धावांवर आटोपला. केएल राहुलने शानदार शैलीत शतक झळकावले. राहुलने 137 चेंडूत 14 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात यशस्वी गोलंदाज कागिसो रबाडा होता, त्याने 5 बळी घेतले. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या नांद्रे बर्जरने 3 बळी घेतले.