2024 T20 World Cup, Team India Playing 11 : आयपीएलच्या थरारानंतर टी20 विश्वचषकाचा महासंग्राम रंगणार आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या महाकुंभाकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी20 विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरले. पण तेव्हापासून भारताला विश्वचषक जिंकता आला नाही. यावेळी भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हटले जातेय. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा भऱणा आहे. विश्वचषकासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल.. कुणाला संधी मिळणार ? कुणाला बेंचवर बसावे लागणार ? याची जोरदार चर्चा सुरु आहे. पाहूयात भारताची संभाव्य प्लेईंग 11
फलंदाजीत कोण कोण ? सलामीला कोण ?
विराट कोहली आणि रोहित शर्मा टी20 विश्वचषकात सलामीला उतरणार, असल्याचा दावा अनेकांनी केला. पण हे शक्य दिसत नाही. कारण, य़शस्वी जायस्वाल भन्नाट फॉर्मात आहे. त्यात तो डावखुरा फलंदाजी करतो. त्यामुळे यशस्वी जायस्वाल याला संघाबाहेर ठेवण्याची रिस्क रोहित शर्मा घेणार नाही. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल डावाची सुरुवात करतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, तर मिस्टर 360 डिग्री म्हणजेच सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार आहे. पाचव्या क्रमांकावर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पत मैदानात उतरेल, तर अष्टपैलू हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. रवींद्र जाडेजा सातव्या क्रमांकावर उतरणार आहे. रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या या दोन अष्टपैलू खेळाडूंमुळे टीम इंडिया अधिक संतुलीत दिसत आहे. त्याशिवाय शिवम दुबे याला संधी दिली, तर टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार आहे.
गोलंदाजात कुणाला मिळणार संधी ?
कुलदीप यादव प्रमुख फिरकी गोलंदाजाची भूमिका पार पाडेल. तर जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा संभाळणार आहे. कुलदीपच्या जोडीला रवींद्र जाडेजा असेल. जर तीन फिरकी गोलंदाजासह उतरण्याची वेळ आल्यास युजवेंद्र चहल अथवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे. जसप्रीत बुमराह याच्यासोबत अर्शदीप सिंह आणि मोहम्मद सिराज यांच्यापैकी एकाला संधी मिळणार आहे.
2024 टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11 -
रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह/युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
2024 टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचे शिलेदार कोणते ?
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू - शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद आणि आवेश खान.