Roger Federer Retirement : टेनिस जगतातील दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यानं (Roger Federer) मागील अनेक वर्षे टेनिस जगतावर राज्य केलं. 20 ग्रँडस्लॅम खिशात घातलेल्या फेडररनं गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीनंतर जगभरातील चाहते तसंच सर्वच प्रसिद्ध व्यक्ती यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. यानंतर आता रॉजरच भारत आणि दिग्गज भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्याशी असलेलं खास नातं आणि त्यासंबधी किस्सा व्हायरल होत आहे.
तर ही गोष्ट चार वर्षे जुनी आहे. रॉजर फेडररने 2018 च्या विम्बल्डन स्पर्धेत भाग घेतला होता. सामन्यादरम्यान त्याने एक असा शॉट खेळला की जो सहसा फक्त क्रिकेटमध्येच पाहायला मिळतो. फेडररचा हा शॉट क्रिकेटमधल्या फॉरवर्ड डिफेन्स या शॉटसारखा होता. त्याचा हा शॉट पाहिल्यानंतर सचिनने त्याला एका पोस्टमध्ये टॅग करत लिहिलं होतं की, तू तुझं नववं विम्बल्डन विजेतेपद जिंकल्यानंतर आपण क्रिकेट आणि टेनिसच्या नोट्स एकमेकांशी शेअर करू. ज्यावर फेडररनेही मजेशीर उत्तर देत लिहिलं की, 'तुम्ही कशाची वाट पाहत आहात? मी नोट्स घेण्यास तयार आहे.' यावर सचिन म्हणाला होता की ठीक असेल तर पहिला अध्याय स्ट्रेट ड्राइव्हचा असेल.
दरम्यान दोघांतील या चर्चेनंतर आयसीसीनेही मजेशीर असं ट्वीट करत फलंदाजांच्या यादीत रॉजर फेडरर अव्वल असल्याचा एक एडिटेड फोटो पोस्ट केला होता.
तीन वेळा रॉजरनं भारताला दिली आहे भेट
रॉजर फेडररनं आतापर्यंत तीन वेळा भारताचा दौरा केला आहे. 2006 मध्ये ते पहिल्यांदा भारतात आले होते. यानंतर 2014 आणि 2015 मध्ये झालेल्या इंटरनॅशनल प्रीमियर लीगमध्ये भाग घेण्यासाठी तो भारतात आला होता. 2014 च्या दौऱ्यात त्याने भारतासाठी एक ट्वीट केले होते. त्याने लिहिले होते की, 'मी येथे घालवलले अद्भूत क्षण मला नेहमीच आठवतील. धन्यवाद, भारत. प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळाला. मी सदैव ऋणी राहीन.' आपल्या भारत दौऱ्यात पत्रकार परिषदेतही त्याने भारतात खूप मजा केल्याचं सांगितलं होतं. भविष्यात दीर्घ दौऱ्यावर भारतात येणार असल्याचंही तो म्हणाला होता.
हे देखील वाचा-