Riyan Parag Smoking Video RR vs PBKS IPL 2026:आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल (28 एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स (RR vs PBKS) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. पंजाब किंग्सचा या हंगामातील हा पहिला पराभव ठरला. राजस्थानकडून डोनोवॅन फरेराने 26 चेंडूत 52 धावा केल्या. या खेळीमुळे डोनोवॅन फरेराला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.
राजस्थान आणि पंजाबच्या या सामन्यापेक्षा सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागची (Riyan Parag E-Cigarette) चर्चा रंगली आहे. सामना सुरु असताना रियान परागचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिआन पराग 'व्हेपिंग' (ई-सिगारेटचा वापर) करताना दिसून येत आहे. या घटनेचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, बीसीसीआय आणि क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय? (Riyan Parag Smoking Video)
राजस्थान रॉयल्सच्या डावातील 16 व्या षटकादरम्यान जेव्हा प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेऱ्यांनी ड्रेसिंग रूममधील दृश्यांवर लक्ष केंद्रित केले. या दृश्यांमध्ये, रियान पराग हा त्याचे सहकारी खेळाडू ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांच्या उपस्थितीत ई-सिगारेटचा वापर करत असताना दिसून येत आहे. नियमांनुसार, स्टेडियमच्या आवारात आणि ड्रेसिंग रूमच्या आत धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. शिवाय, भारताच्या 'इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्या' (PECA), २०१९ अंतर्गत, व्हेपचे उत्पादन, विक्री आणि वापर पूर्णपणे बेकायदेशीर मानला जातो; या कायद्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आणि अगदी तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.
BCCI कडून कठोर कारवाईचे संकेत- (Riyan Parag Smoking Video)
सदर घटनेची बीसीसीआयकडून अत्यंत गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे मानले जात आहे. एखाद्या खेळाडूसाठी, व्हेपिंग केवळ आरोग्याच्या दृष्टीनेच हानिकारक नसते, तर ते सुरक्षा नियमांचे (प्रोटोकॉल्सचे) उल्लंघन देखील ठरते; कारण या पदार्थांची नेमकी रासायनिक रचना अनेकदा अस्पष्ट असते. राजस्थान रॉयल्ससाठी या हंगामातील हा दुसरा मोठा वाद ठरला आहे. यापूर्वी घडलेल्या एका घटनेत, संघाच्या व्यवस्थापकाला (मॅनेजरला) 'डगआउट'मध्ये मोबाईल फोन वापरल्याबद्दल BCCI कडून ताकीद आणि दंड ठोठावण्यात आला होता.
सोशल मीडियावर रियान परागबाबत खळबळजनक दावे- (Riyan Parag Smoking Video)
रियान पराग ड्रेसिंग रूमच्या आत धूम्रपान करताना आढळून आल्यानंतर आता सोशल मीडियावर विविध दावे करण्यात येत आहेत. रियान परागवर बीसीसीआय कठोर कारवाई करणार असून यामध्ये त्याला दोन ते तीन सामन्यांची बंदी देखील घालू शकते. रियान परागवर बंदीची कारवाई केल्यानंतर यशस्वी जैस्वालकडे राजस्थान संघाचा नेतृत्व सोपवले जाणार असल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे.
