ICC Test Rankings Update News : आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा बदल मोठा झाला आहे. मात्र, टॉप 2 च्या क्रमवारीत अद्याप कोणताही बदल झालेला नाही. दरम्यान, जो रूटला रेटिंगमध्ये फटका बसला आहे. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतीय संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंतचा धमाका पाहिला मिळाला आहे. ऋषभ पंत आणि सरफराज खान यांनी ताज्या कसोटी क्रमवारीत गरूड झेप घेतली आहे.


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बंगळुरू येथे खेळला गेला. या सामन्यात सर्फराज आणि ऋषभ यांनी दमदार कामगिरी केली होती. त्यानंतर ऋषभ पंतने टॉप 10 फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीला मागे टाकले आहे. यशस्वी जैस्वालचा पहिल्या पाच यादीत समावेश आहे. 


आयसीसीने नवीनतम कसोटी क्रमवारीत भारताच्या तीन खेळाडूंचा टॉप 10 मध्ये समावेश आहे. यशस्वी जैस्वाल चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे 780 गुण आहेत. ऋषभ पंतने तीन स्थानांची झेप घेतली आहे. तो विराट कोहलीच्याही पुढे गेला आहे. पंतचे 745 गुण आहेत. कोहली आठव्या स्थानावर आहे. या तिघांशिवाय टॉप 10 मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही.






सर्फराज खानने 31 स्थानांची घेतली झेप 


सर्फराजने न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत दमदार कामगिरी केली होती. त्याने दुसऱ्या डावात 150 धावा केल्या. याचा फायदा सर्फराजला क्रमवारीत झाला आहे. तो आता संयुक्त 53 व्या स्थानावर पोहोचला आहेत. सर्फराजने कसोटी फलंदाजी क्रमवारीत 31 स्थानांनी झेप घेतली आहे. त्याच्या कारकिर्दीतील हे मोठे यश आहे.






कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीत जडेजा अव्वल स्थानावर


कसोटीतील पुरुष अष्टपैलूंच्या क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानावर कायम आहे. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अक्षर पटेल सातव्या स्थानावर कायम आहे. जसप्रीत बुमराह कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. अश्विन गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. जडेजा संयुक्तपणे सहाव्या स्थानावर आहे.