मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना या महिन्यात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड संघात हा सामना होणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी बीसीसीआयने खेळाडूंना मोठा दिलासा दिला आहे. भारतीय संघाच्या खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि सहाय्यक स्टाफला इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळाली आहे.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीचा आहे. भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरोधात जागतिक कसोटी विजेतेपदाचा अंतिम सामना खेळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिकाही होणार आहे.
संपूर्ण दौऱ्यात खेळाडूंचं कुटुंब त्यांच्यासोबत इंग्लंडमध्ये राहू शकतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "भारतीय खेळाडूंना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळाली आहे. जोपर्यंत त्यांना राहायचं आहे तोपर्यंत ते खेळाडूंसोबत राहू शकतात. जर त्यांना दौऱ्याच्या संपूर्ण कालावधीपर्यंत राहायचं असेल तरी ते राहू शकतात."
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही क्रिकेटपटूंना मंजुरी भारतीय पुरुषांचा क्रिकेट संघ, महिला क्रिकेट संघासह चार्टर प्लेनने इंग्लंडला रवाना होणार आहे. महिला खेळाडूंना हे नियम लागू नाहीत. महिला क्रिकेट संघाचा दौरा मर्यादित काळासाठी असल्याने त्यांना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता कमीच आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही खेळाडूना कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी मिळाली होती.
पुरुषांचा संघ तिथे 100 दिवसांपेक्षा जास्त काळ राहणार आहे. तर महिला क्रिकेट संघाचा दौरा महिनाभराचा आहे, ज्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेण्टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ 3 जून रोजी लंडनला पोहोचणार असून तिथून साऊथम्पटनला रवाना होईल आणि तिथे त्यांना क्वॉरन्टीन राहावं लागेल.
पुढील काही महिने भारतीय क्रिकेटपटूंसाठी अतिशय व्यस्त आहेत. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर तातडीने यूएईमध्ये आयपीएलच्या चौदाव्या मोसमातील उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहेत. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकपही खेळवला जाणार आहे.