मुंबई : बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर अखेर भारतीय क्रिकेट संघ परदेशी दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वीच रवाना झाला. सध्या हा संघ कोरोना नियमांनुसार विलगीकरणात आहे. इथंही संघातील खेळाडू धमाल करत असून, आपआपल्या परीनं या वेळेचा सदुपयोग करत आहेत. भारतीय संघाची धुरा असणारा खेळाडू विराट कोहली यानंही क्वारंटाईनमध्ये असताना गंमत म्हणून आपल्या फॉलोअर्सशी अनोखा संवाद साधण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यानं इन्स्टाग्रामची निवड केली. 


प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विराटनं फॉलोअर्सशी संवाद साधण्यास सुरुवात केली. त्यानं विचारायला आणि प्रश्नांची बरसात व्हायला, असंच काहीसं चित्र यावेळी पाहायला मिळालं. यामध्ये एक प्रश्न विराटला थेट त्याच्या पत्नीनं म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं विचारला होता. 


घरात एखादी वस्तू हरवली किंवा ती सहजासहजी मिळत नसली, की तिथं वावरणाऱ्या व्यक्तीला त्यासंबधीची विचारणा केली जाते. अनुष्कानंही काहीसं असंच केलं. तू माझे हेडफोन कुठे ठेवलेयस?, असा प्रश्न तिनं या सेशनमध्ये विराटला विचारला. तिच्या या प्रश्नाचं उत्तर देत विराटनं लिहिलं, नेहमीच असतात तिथे... बेडच्या शेजारी साईड टेबलवर. आपल्या या उत्तरामध्येही विराट रोमँटिक अंदाजात अनुष्काचा उल्लेख करायला विसरला नाही. “Always on the side table next to the bed love”, असं त्यानं तिला उत्तर देत लिहिलं आणि बस्स.... मग काय चाहत्यांनाही या सेलिब्रिटी जोडीच्या केमिस्ट्रीचा पुन्हा एकदा हेवा वाटला. 


IPL 2021 : आयपीएलमधील उर्वरित सामने यूएईमध्ये होणार, BCCI चा महत्त्वाचा निर्णय




विराटला या सेशनमध्ये फॉलोअर्सनी बहुविध प्रश्न विचारले. मुलीच्या वामिका या नावाच्या अर्थापासून तिची पहिली झलक आम्हाला केव्हा पाहायला मिळेल असे प्रश्न त्याला विचारण्यात आले. यावेळी एक जबाबदार वडील म्हणून उत्तर देत विराटनं सर्वांचं मन जिंकलं. 


वामिका हे देवीचं, दुर्गा मातेचंच एक नाव आहे असं सांगत आपल्या मुलीला सोशल मीडियाची आणि योग्य- अयोग्याची समज येत नाही तोवर तिला या माध्यमात आणायचं नाही, असा निर्णय आम्ही दोघांनी (मी आणि अनुष्काने) मिळून घेतला असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. 




समाज माध्यमं अर्थात सोशल मीडिया सर्रास वापरलं जात असलं तरीही, योग्य वेळीच त्याचा वापर योग्य पद्धतीनं केला जाणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं म्हणत विराट यासाठीच आग्रही दिसला. त्याच्या या उत्तरानं आणि निर्णयानं सर्वांचीच मनं जिंकली.