Ravichandran Ashwin in Rajasthan Royals : रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) हा भारतीय क्रिकेट संघातील अनुभवी, प्रतिभावान, आणि सर्व नियम जाणणारा अभ्यासू खेळाडू म्हणून ओळखला जातो. काही लोक त्याला भारतीय क्रिकेट संघाचा शास्त्रज्ञ देखील म्हणतात. अश्विनची आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सने (Rajsthan Royals) याच गोष्टीला पकडून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.


या व्हिडिओमध्ये अश्विन एका प्रयोगशाळेत काही वैज्ञानिक प्रयोग करताना दिसत आहे. याशिवाय, व्हिडिओमध्ये तो बुद्धिबळ खेळताना, फलंदाजी करताना, गोलंदाजी करताना, चेंडूची चमक कमी करण्यासाठी तंत्राचा वापर करताना आणि पत्नी प्रीतीसोबत नृत्य करताना देखील दिसत आहे.


राजस्थान रॉयल्सने अश्विनचा मजेदार व्हिडिओ केला शेअर 


अश्विनची सध्याची आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सने त्याच्या ट्वीटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'अॅश अण्णा अशाच एका दुसऱ्या विश्वात' ट्विटरवर अपलोड झाल्यानंतर लगेचच हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला असून अश्विनच्या चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या मजेदार प्रतिक्रिया देण्यास देखील सुरुवात केली आहे.


पाहा VIDEO-






अश्विनची भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी


अश्विनच्या खेळावर नजर टाकली तर, ऑस्ट्रेलियासोबत सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये अश्विनसह जाडेजाने शानदार गोलंदाजी केली आणि भारताने दोन्ही सामने जिंकले, मात्र तिसऱ्या सामन्यात तसं झालं नाही. तिसऱ्या म्हणजेच इंदूर कसोटी सामन्यात अश्विनला त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीने काही खास दाखवता आले नाही आणि त्याचा परिणाम भारताच्या पराभवात झाला.


3 सामन्यात 18 विकेट


बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 साठी खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये अश्विनने आतापर्यंत एकूण 79 धावा देऊन 18 बळी घेतले आहेत. भारतीय संघ या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथे खेळणार आहे. आता अखेरच्या कसोटी सामन्यात अश्विन कितपत अप्रतिम कामगिरी करतो हे पाहावे लागेल.


नुकताच केला खास रेकॉर्ड


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अश्विनने तीन बळी घेतले. आधी पीटर हँड्सकॉम्बची विकेट घेत त्याने कपिल देव यांच्या 687 आंतरराष्ट्रीय विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवताना कपिल देव यांचा रेकॉर्डही मोडला. त्यानंतर अश्विनने नॅथन लायनला बोल्ड करून त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेटची संख्या 689 वर नेली. दुसऱ्या डावातही अश्विनने एक विकेट घेतली. दरम्यान अश्विनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 467, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 151 आणि आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 72 विकेट्स आहेत. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.


हे देखील वाचा-