Ravi Shastri likely to replace Ajit Agarkar BCCI Selection Committee : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून दूर करत शुभमन गिलला नवीन कर्णधार म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर त्यांच्यावर सतत टीका होत आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्माने कर्णधार म्हणून आपल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवून दिले होते. दरम्यान, क्रिकेटविश्वात आता आणखी एका मोठ्या बदलाची चर्चा रंगली आहे. असा दावा केला जात आहे की माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे अजित आगरकर यांच्या जागी बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष बनू शकतात.

Continues below advertisement

रवी शास्त्री होणार निवड समितीचे नवे अध्यक्ष?

भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे अजित आगरकर यांच्या जागी बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष बनू शकतात, अशी चर्चा आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या निवड समितीने गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, मात्र टीम निवडीतील काही वादग्रस्त निर्णयांवरून बोर्डामध्ये असमाधान असल्याचे कळते. त्यामुळे बीसीसीआय शास्त्रींना निवड समितीच्या प्रमुखपदी आणण्याचा विचार करत आहे. रवी शास्त्री यांनी यापूर्वी 2017 ते 2021 या काळात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने परदेशात ऐतिहासिक मालिकांचा विजय मिळवला आणि अनेक तरुण खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली होती. 

Continues below advertisement

बीसीसीआयचा अजित आगरकरांबाबत महत्त्वाचा निर्णय 

पण ही फक्त चर्चा आहे, कारण बीसीसीआयने अजीत आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून पुढेही कार्यरत राहतील. भारतीय संघाच्या यशस्वी प्रवासाचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. आगरकर जुलै 2023 मध्ये मुख्य निवडकर्ता बनले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या आयसीसी विश्वचषकात अंतिम फेरी गाठली, तसेच 2024 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. या यशामुळे बीसीसीआयने त्यांचा कार्यकाळ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले, “त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक विजेतेपदे जिंकली, तसेच टेस्ट आणि टी20 स्वरूपात बदल घडले. बीसीसीआयने त्यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला असून, आगरकर यांनी काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव मान्य केला आहे.”

हे ही वाचा -

India-Australia ODI XI : रोहित शर्मा अन् विराट कोहली बाहेर; चॅम्पियन कर्णधाराने निवडली ऑलटाइम बेस्ट वनडे टीम, कोणाकोणाचा समावेश?