Bengal vs Saurashtra : रणजी ट्रॉफी 2022-2023 (Ranji Trophy Final) चा अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ अखेर संपला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सौराष्ट्रने 2 गडी गमावून 81 धावा केल्या असून, आतापर्यंत त्यांची स्थिती मजबूत दिसत आहे. त्याआधी, सौराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात बंगालची सुरुवातच खराब झाली होती. त्यांनी सुरुवातीपासून अनेक विकेट गमावल्या होत्या.


बंगालचा संघ अवघ्या 174 धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून शाहबाज अहमद (69) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पारोलनेही 50 धावांची खेळी केली. या दोन खेळाडूंशिवाय बंगालच्या एकाही खेळाडूला 20 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने 13.1 चेंडूत 44 धावा देत 3 बळी घेतले. त्याच्याशिवाय चेतन साकारियानेही 13 षटकात 33 धावा देत 3 बळी घेतले, तर चिराग जानी आणि डीए जडेजा यांनी 2-2 विकेट्स घेण्यात यश मिळवलं.


सौराष्ट्राच्या नावावर पहिला दिवस


पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सौराष्ट्रने पहिल्या डावात 17 षटकांत 2 गडी गमावून 82 धावा केल्या होत्या. यष्टिरक्षक हार्विक देसाई 51 चेंडूत 38 धावा केल्यानंतर त्याच्या वतीने फलंदाजी करत आहे. त्याचवेळी जय गोहिल 6 आणि विश्वराज जडेजा 25 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. सौराष्ट्रकडून, चेतन साकारियाला नाईटवॉचमन म्हणून फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, जो 9 चेंडूत 2 धावा केल्यानंतर क्रीजवर आहे. आता सौराष्ट्रला बरोबरी साधण्यासाठी फक्त 93 धावांची गरज असून त्यांच्या 8 विकेट शिल्लक आहेत. बंगालकडून मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनी आतापर्यंत 1-1 विकेट घेतली आहे. आता या सामन्यात बंगालच्या संघाला दमदार पुनरागमन करायचे असेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सौराष्ट्र संघाला लवकरात लवकर ऑलआऊट करावे लागेल.


फायनलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जयदेवनं घेतली विकेट


या सामन्यात जयदेव सौराष्ट्रचं नेतृत्व करत असून त्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयदेवने स्वतःच्या पहिल्याच षटकातच विकेट घेत आपला निर्णय योग्य असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर अवघ्या 2 धावांवर बंगालच्या 3 फलंदाजांना सौराष्ट्र संघानं पॅव्हेलियनमध्ये पाठवलं आहे. त्यानंतर बंगालचा संपूर्ण संघ अवघ्या 174 धावांत ऑलआऊट झाला. या डावात जयदेवने 13.1 षटकात 44 धावांत 3 बळी घेतले आणि यासह तो 300 बळी घेणारा सौराष्ट्रासाठी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील पहिला गोलंदाज ठरला. डाव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने 2010 मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. ज्यानंतर कारकिर्दीच्या 77 व्या सामन्यात बंगालच्या मुकेश कुमारला बाद करून हा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.


हे देखील वाचा-