Shahrukh khan Ranji Trophy 2022 : तामिळनाडूचा विस्फोटक फलंदाज शाहरुख खानला नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात पंजाबने 9 कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्यानंतर काही दिवसांतच शाहरुख खान याने रणजी चषकात तुफानी फटकेबाजी केली. शाहरुखने रणजी सामन्यात झटपट 94 धावांची खेळी केली. शाहरुखची फलंदाजी पाहून पंजाबचा संघाला दिलासा मिळाला आसेल. कारण, पुढील काही दिवसांत आयपीएल स्पर्धा होणार आहे. त्यापूर्वीच शाहरुखने तुफान फटकेबाजी करत आपल्यावर लावलेली किंमत योग्य असल्याचा इशारा दिला आहे. 


दिल्लीविरोधात झालेल्या सामन्यात शाहरुख खान याने दमदार प्रदर्शन केले. फक्त सहा धावांसाठी शाहरुख खानचे द्विशतक हुकले. शाहरुख खान याने 194 धावांची तुफानी फलंदाजी केली. शाहरुख आणि बाबा इंद्रजीत यांच्या शतकी खेळाच्या जोरावर तिसऱ्या दिवशी तामिळनाडू संघाने 42 धावांची आघाडी घेतली आहे. शाहरुख खान याने 148 चेंडूत 194 धावांची तुफानी खेळी केली. शाहरुख खान याने आपल्या विस्फोटक खेळीदरम्यान 20 चौकार आणि 10 षटकार लगावले. तर बाबा इंद्रजीतने 149 चेंडूत 117 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान इंद्रजीतने 17 चौकार आणि दोन षटकार लगावले. शाहरुख खान आणि इंद्रजीत यांनी सहाव्या विकेटसाठी 134 धावांची भागिदारी केली. त्यामुळे तामिळनाडूने पहिल्या डावात 494 धावा चोपल्या. दिल्लीने पहिल्या डावात 452 धावा केल्या होत्या. सध्या तामिळनाडूकडे 42 धावांची आघाडी आहे. 


शाहरुख खानने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. शाहरुख खानपुढे दिल्लीची गोलंदाजी दुबळी दिसत होती. शाहरुख खानने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलं शतक झळकावले. इंद्रजीत बाद झाल्यानंतर एन जगदीशनसोबत शाहरुख खान याने 108 धावांची भागिदारी केली. जगदीशन याने 50 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दिल्लीकडून विकास मिश्र याने 108 धावांच्या मोबदल्यात सहा विकेट घेतल्या.  


 






मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live