Continues below advertisement

मुंबई : आयपीएलच्या 19 व्या हंगामात राजस्थान रॉयल्स त्यांचं होम ग्राऊंड बदलण्याबाबत विचार करत आहे. राजस्थान रॉयल्सकडून जयपूर ऐवजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील ग्राऊंडची चाचपणी केली जात आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार राजस्थान रॉयल्स त्यांचे सामने पुण्यात हलवू शकते, मात्र याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. होम ग्राऊंड बदलण्याबाबत अंतिम निर्णय बीसीसीआयकडून घेतला जाणार आहे. मात्र, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला त्यांना कोणत्या फ्रेंचायजीला होस्ट करायचं आहे हे ठरवावं लागेल.

Rajasthan Royals : राजस्थानचं होम ग्राऊंड बदलणार?  

राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनानं नव्या होम ग्राऊंडसाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या ग्राऊंडला त्यांची पसंती आहे. राजस्थान रॉयल्स आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार फ्रँचायजीची एक टीम अलीकडेच स्टेडियम, हॉटेल्सचे पर्याय, विमानतळ कनेक्टिविटी आणि इतर दळणवळणाच्या सोयींची आढावा घेण्यासाठी पुण्यात आली होती.

Continues below advertisement

राजस्थान रॉयल्सला होम ग्राऊंड का बदलायचंय?

रिपोर्टनुसार राजस्थान रॉयल्स होम ग्राऊंड बदलण्याचं कारण राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत काही समस्या आहेत. गेल्या हंगामात राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्यानं टीमवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. हा आरोप फ्रँचायजीनं फेटाळला होता. जर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं पुण्याचं ग्राऊंड राजस्थानचं होम ग्राऊंड झालं तर 19 व्या हंगामात 4 मॅच खेळेल. तर 3 सामने गुवाहाटीत होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील एक टीम त्यांच्या होम ग्राऊंडवर 7 मॅच खेळते.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्यानं क्रिकबझला दिलेल्या माहितीनुसार राजस्थानचे प्रतिनिधी स्टेडियमची क्षमता, खेळपट्टी, हॉटेल्स याबाबत माहिती घेण्यासाठी आले होते. आयपीएलचे सामने पुन्हा पुण्यात आयोजित करण्यास आमचे अध्यक्ष रोहित पवार उत्सुक असल्याचं एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. पुण्यातील स्टेडियमवर आयपीएलचा शेवटचा सामना 2022 मध्ये झाला होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून देखील मैदानाचा शोध घेतला जात आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे सामने होणार नाहीत अशा चर्चा आहेत. बंगळुरुनं 18 व्या हंगामाचं विजेतेपद मिळवल्यानंतर स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली होती. आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील कोणत्या संघाला पुण्याचं मैदान होम ग्राऊंड म्हणून मिळतं हे पाहावं लागेल. कर्नाटक सरकारनं चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे सामने आयोजित करण्यास परवानगी दिल्यास आरसीबीचा निर्णय बदलू शकतो. आरसीबीनं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे 16 डिसेंबरपर्यंतचा वेळ मागितल्याची माहिती आहे.  त्यामुळं पुण्याचं मैदान नेमकं कोणाला मिळणार ते पाहावं लागेल.