मुंबई : बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयनं नियमित कॅप्टन शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्यानं नवा कॅप्टन निवडला आहे. वनडे मालिकेसाठी कर्णधारपद केएल राहुल याला देण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या घोषणेमुळं शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळं दुसऱ्या कसोटीनंतर वनडे मालिकेला देखील मुकल्याचं स्पष्ट झालं आहे. शुभमन गिल दुखापतग्रस्त असल्यानं महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला 15 जणांच्या संघात स्थान दिलं आहे.
भारताच्या निवड समितीनं कॅप्टन म्हणून अनुभवी फलंदाज केएल राहुल याच्या नावाला पसंती दिली आहे. निवड समितीनं रोहित शर्माच्या नावाचा कर्णधार म्हणून पुन्हा विचार केलेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
Team India for ODI Series : भारताचा संघ जाहीर
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कॅप्टन, विकेटकीपर), रिषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा,कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल,
शुभमन गिल मालिकेतून बाहेर
भारताच्या कसोटी आणि वन डे संघाचा नियमित कर्णधार शुभमन गिल कोलकाता येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. शुभमन गिलच्या मानेत वेदना होत होत्या. त्यामुळं शुभमन गिल दुसऱ्या कसोटीला मुकला. आता तो दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेला देखील मुकला आहे. तो टी 20 मालिकेपर्यंत बरा होऊन संघात परतणार का याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयनं कॅप्टन म्हणून अनुभवी फलंदाज केएल राहुलला संधी दिली आहे. तो 2023 पर्यंत भारताच्या सर्व संघाचा उपकर्णधार होता. गिल दुखापतग्रस्त असल्यानं महाराष्ट्राचा खेळाडू ऋतुराज गायकवाडला 15 जणांच्या संघात स्थान मिळालं आहे.
भारताचा उपकॅप्टन श्रेयस अय्यर देखील ऑस्ट्रेलियात कॅच घेताना जखमी झाला होता. त्यामुळं तो देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेला मुकला आहे.
मोहम्मद सिराजला वगळलं
ऑस्ट्रेलियात झालेल्या वनडे मालिकेत भारताच्या संघात मोहम्मद सिराजचा समावेश होता. मात्र, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत संघात स्थान देण्यात आलेलं नाही. वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांची निवड करण्यात आली आहे.
वनडे मालिकेचं वेळापत्रक
30 नोव्हेंबर : पहिली वनडे, रांची
3 डिसेंबर : दुसरी वनडे, रायपूर
6 डिसेंबर : तिसरी वनडे, विशाखापट्टणम