Rahul Dravid On T20 World Cup 2024 : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. विश्वचषकाआधी भारताने सर्व आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. आता भारतीय खेळाडूंना विश्वचषकाच्या तयारीसाठी फक्त आयपीएल हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. टी 20 विश्वचषकाआधी झालेल्या अखेरच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाने अफगाणिस्तानचा 3-0 असा धुराळा उडवला. अफगाणिस्तानविरोधातील टी 20 मालिकेनंतर कोच राहुल द्रविड यांनी टीम इंडियाकडे अनेक पर्याय असल्याचे म्हटलेय. 


युवा खेळाडूंना संधी - 


अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरोधात झालेल्या टी 20 मालिकेत टीम इंडियाकडून अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. कारण, संघातील सिनियर खेळाडूंना आराम हवा होता किंवा दुखापतग्रस्त होते. अशा स्थितीत भारतीय युवा खेळाडूंना प्रभावी कामगिरी करत टी 20 विश्वचषकासाठी आपला दावा ठोकलाय.  आगामी विश्वचषकात भारतीय संघाची निवड करताना निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, त्यांना अंतिम 15 खेळाडूंची निवड करताना कसरत करावी लागणार आहे. 


अनेक पर्याय, पण काहींचा पत्ता कट होणार - 


अतिरिक्त पर्याय असल्यामुळे टी 20 विश्वचषकामध्ये कोणत्याही खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता जास्त आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा टी 20 सामना जिंकल्यानंतर कोच राहुल द्रविड यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केले. राहुल द्रविड म्हणाला की, वनडे विश्वचषकानंतर टीम इंडियाकडून वेगवेगळे खेळाडू खेळले. त्याची अनेक कारणं असतील. पण आपल्याकडे अनेक पर्याय आहेत, ही जमेची गोष्ट आहे. 


आपल्याला काही गोष्टींवर काम करायला हवं, त्यावर विचार सुरु आहे. एक संघ म्हणून तितके सामने झाले नाहीत. आयपीएल आहे, ज्यामध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर नजरा असतील, असे राहुल द्रविड म्हणाले. 


शिवम दुबेच्या कामगिरीवर गुरुजी खूश - 


युवा शिवम दुबे याने अफगाणिस्तानविरोधात प्रभावी कामगिरी केली. गोलंदाजी आणि फलंदाजीत त्याने अमुलाग्र योगदान दिले. कोच राहुल द्रविड शिवम दुबे याच्या कामगिरीवर खूश झाले. ते म्हणाले की, शिवम दुबे खूप दिवसानंतर संघात परतला. तो आता पहिल्यापेक्षा प्रभावी दिसतोय. त्यामध्ये टॅलेंट नेहमीचं राहिलेय. त्याच्या कामगिरीवर मी खूश आहे. त्याचा कॉन्फिडन्सही वाढला आहे. 


विकेटकिपरचे अनेक पर्याय -  


त्याशिवाय राहुल द्रविड याने विकेटकिपरच्या पर्यायावरही सांगितले. राहुल द्रविड म्हणाला की, आपल्याकडे खूप सारे पर्याय आहे. संजू सॅमसन, ईशान किशन, ऋषभ पंत यांच्यासारखे पर्याय आहेत. आता पुढील काही महिन्यातील परिस्थिती काय असेल, त्यानुसार निर्णय घेतला जाईल. पण विकेटकिपर म्हणून आपल्याकडे अनेक पर्याय आहेत.