बंगळुरू : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या भारतीय अ संघ तसेच अंडर-19संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची नियुक्ती  राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) च्या प्रमुखपदी करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) कडून सोमवारी ही घोषणा करण्यात आली.

बीसीसीआय ने म्हटले आहे की, द्रविड यांना बंगळुरू स्थित एनसीएच्या प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले आहे. ते एनसीएमध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतील. तसेच खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला प्रशिक्षण आणि ट्रेनिंग देण्याचे काम करतील.  यासोबत द्रविड भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या प्रशिक्षकांसोबत काम करतील.

निवृत्ती घेतल्यानंतर द्रविडने युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सुरु केले आहे. तो 2016 पासून अंडर-19 टीमचा प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनात भारताने सलग दोन वेळा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्थान मिळवले तर  2018 मध्ये संघाने अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले. द्रविडच्या मार्गदर्शना मयंक अग्रवाल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत सारखे खेळाडू तयार झाले आहेत.

आता द्रविडवर बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या प्रमुखपदाची जबाबदारी आली आहे.  त्यामुळे १९ वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.