Cheteshwar Pujara on R Ashwin Future Coach Team India : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला यशापेक्षा पराभवांचीच जास्त चव चाखावी लागली आहे. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर गंभीर यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतही टीम इंडियाला दारुण पराभव सहन करावा लागला. मात्र, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे त्यांच्यावरचा दबाव काहीसा कमी झाला. इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राहिल्याने गंभीर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Continues below advertisement


सध्या टीम इंडिया आशिया कपच्या तयारीत व्यस्त आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने माजी अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विन याला भविष्याचा सर्वात योग्य प्रशिक्षक म्हणून पसंती दिली आहे. तो अश्विनलाच का सर्वोत्तम पर्याय मानतो, याची चर्चा आता रंगू लागली आहे.


 पुजारा का मानतोय अश्विन योग्य पर्याय?


ESPNcricinfo च्या एका प्रश्नोत्तर सत्रात पुजाराला विचारण्यात आलं की, भारताचा भविष्यातला कोच कोण होऊ शकतो? त्यावर त्याने कोणतीही शंका न घेता थेट अश्विनचं नाव घेतलं. पुजाराचं म्हणणं आहे की, अश्विन खेळ खूप बारकाईने समजतो आणि फलंदाजी-गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याची पकड उत्तम आहे. त्यामुळेच तो कोच पदासाठी मजबूत दावेदार ठरू शकतो.


आयपीएल 2025 मध्ये निराशाजनक कामगिरी


आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अश्विनने शेवटचं आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळलं. पण हा हंगाम त्याच्यासाठी विस्मरणीय ठरला. त्याने 9 सामन्यांत फक्त 7 विकेट घेतले आणि 283 धावा दिल्या. CSK ची कामगिरीही अत्यंत खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे संघ 14 पैकी फक्त 4 सामने जिंकू शकला आणि सर्वात खालच्या स्थानावर राहिला.


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अश्विनची कामगिरी


अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रवीचंद्रन अश्विनचा करिअर अत्यंत शानदार राहिला आहे. तो भारताकडून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून निवृत्त झाला. अश्विनने एकूण 765 बळी घेतले, तर अनिल कुंबळे 956 बळीसह पहिल्या क्रमांकावर आहेत. अश्विनने टीम इंडियासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 537 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 6 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3503 धावा केल्या आहेत. 


टीम इंडियासाठी अश्विनने 116 एकदिवसीय सामने खेळले आहे. यामध्ये त्याने 156 विकेट घेतल्या आहेत आणि 707 धावा केल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये अश्विनने 72 विकेट घेतल्या आहेत आणि 184 धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने 619 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे.


हे ही वाचा - 


Pakistan Squad For Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर! बोर्डाचा धक्कादायक निर्णय; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, जाणून घ्या A टू Z