Puneet Balan Cricket Academy beat Kapil Sons Team : पुनीत बालन क्रिकेट अकादमी (PBCA) यांनी MCA कॉर्पोरेट शिल्ड 2025 स्पर्धेचे विजेतेपद दमदार आणि सर्वसमावेशक कामगिरीच्या जोरावर पटकावले. अंतिम सामन्यात PBCA ने कपिल सन्स संघावर 89 धावांनी मात करत चषकावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत अजेय राहून तसेच स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारत PBCA ने आपले वर्चस्व सिद्ध केले.

Continues below advertisement

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून कपिल सन्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर हा निर्णय त्यांना महागात पडला. PBCA चे सलामीवीर हर्ष मोगाविरा आणि पवन शहा यांनी आक्रमक सुरुवात करत पहिल्या नऊ षटकांतच 76 धावा जोडल्या आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव टाकला. त्यानंतर पवन शहा आणि सचिन ढास यांनी डाव सावरत 157 धावांची शतकी भागीदारी रचली. सचिन ढासने 103 चेंडूंमध्ये संयमी 113 धावांची खेळी केली, तर पवन शहाने 112 चेंडूंमध्ये शानदार 126 धावा ठोकल्या. पवन शहाच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर (प्लेयर ऑफ द मॅच) पुरस्काराने गौरवण्यात आले.

डावाच्या अंतिम टप्प्यात सिद्धार्थ म्हात्रे याने आक्रमक फलंदाजी करत सामन्याचा रंग पूर्णपणे बदलला. अवघ्या 45 चेंडूंमध्ये 88 धावा करत त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. PBCA ने 50 षटकांत 405 धावांचा डोंगर उभारला, जो या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ठरला.

Continues below advertisement

या आव्हानाचा पाठलाग करताना कपिल सन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि संघाने 18 धावांत तीन विकेट्स गमावल्या. कर्णधार सिद्धेश वीर आणि नीरज जोशी यांनी अर्धशतके झळकावत शतकी भागीदारी करत झुंज दिली. अनुराग कावडे आणि अथर्व काले यांनीही अर्धशतकी खेळी केली, मात्र कोणालाही निर्णायक डाव साकारता आला नाही.

PBCA च्या गोलंदाजांनी सामनाभर शिस्तबद्ध मारा केला. रजनीश गुरबानी, शुभम माईद, सिद्धार्थ म्हात्रे आणि जलज सक्सेना यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अखेर कपिल सन्सचा संघ 44.5 षटकांत 314 धावांवर बाद झाला.

विजयानंतर PBCA चे मालक तसेच पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर पुनीत बालन यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, ही कामगिरी खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या एकत्रित मेहनतीचे फलित आहे. अजेय मोहीम, विक्रमी फलंदाजी आणि संतुलित गोलंदाजीच्या जोरावर PBCA ची ही विजयी वाटचाल MCA कॉर्पोरेट शिल्डच्या इतिहासातील एक संस्मरणीय अध्याय ठरली आहे.

हे ही वाचा -

Omkar Tarmale SRH IPL 2026 : शेरेगावचा शेर, मराठमोळ्या ओंकारचं नॉर्मल स्पीड 140, बचत गटातून कर्ज घेऊन ट्रेनिंग, आता IPL गाजवणार!