PCB filed complaint to the ICC : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अहमदाबाद स्टेडियमवर चाहत्यांच्या वागणुकीविरोधात आयसीसीकडे तक्रार केली आहे. 14 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हायव्होल्टेज सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यावेळी पाकिस्तानच्या संघासोबत गैरवर्तन झाल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे म्हणणं आहे. त्याबाबत त्यांनी आयसीसीकडे तक्रार केली आहे.


भारत-पाकिस्तान सामन्यात काय झालं होतं ?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखभर चाहते उपस्थित होते. पाकिस्तानच्या चाहत्यांना व्हिसा न मिळाल्यामुळे भारतीय संघाला सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे प्रमाण जास्त होते. या सामन्यादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातीलच एका व्हिडिओमध्ये मोहम्मद रिझवान आणि पाकिस्तानी खेळाडूंना पाहून चाहते 'जय श्री राम'च्या घोषणा देत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबत आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली आहे. त्याशिवाय अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आमच्या खेळाडूंना चांगली वागणूक मिळाली नाही, असेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 


पाकिस्तानने तक्रारीत काय म्हटले ?


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत आयसीसीकडे तक्रार केल्याची माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये पीसीबीने म्हटले की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तानी पत्रकारांना व्हिसा देण्यात विलंब आणि विश्वचषक 2023 साठी पाकिस्तान चाहत्यांसाठी व्हिसा धोरण नसल्याबद्दल ICC कडे आणखी निषेध नोंदवला आहे. 14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तान संघाला लक्ष्य करण्यात आलेल्या अनुचित वर्तनाबद्दल पीसीबीने तक्रारही दाखल केली आहे.






भारताने आठव्यांदा पाकिस्तानला हरवले -


शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 192 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताने प्रत्युत्तरदाखल 30.3 षटकात हे आव्हान तीन विकेट गमावून सहज पार केले होते. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके ठोकली होती. तर गोलंदाजीत बुमराहने भेदक मारा केला होता. 


दरम्यान, 19 ऑक्टोबर रोजी भारताचापुढील सामना पुण्यात होणार आहे. तर पाकिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगलोरमध्ये होणार आहे.