ICC ODI Rankings : पाकिस्तानला (Pakistan Cricket Team) इतिहासात पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी मिळाली. मात्र पाकिस्तानी संघाला हा मुकुट जास्त काळ राखता आलेला नाही. अवघ्या 48 तासांत पाकिस्ताननं आयसीसी एकदिवसीय क्रिकेट क्रमवारातील पहिलं स्थान गमावलं आहे. भारत (Team India) आणि ऑस्ट्रेलियाने (Australia Cricket Team) पाकिस्तानला पछाडलं आहे. ऑस्ट्रेलिया संघ पुन्हा एकदा आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर त्यामागोमाग दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. दोन दिवस विजयी मुकुट परिधान करणारा पाकिस्तान आता तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 


48 तासांत पाकिस्ताननं गमावलं पहिलं स्थान


भारत आणि ऑस्ट्रेलियाला मागे टाकून 5 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तान आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इतिहासात पहिल्यांदाच क्रमांकाचा संघ बनला. यावर पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट करून जल्लोष साजरा केला होता. पण,  अवघ्या दोन दिवसांत पाकिस्तान पहिल्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर घसरल्याने पाकिस्तान क्रिकेट संघ आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यासाठी लाजीरवाणी परिस्थिती तयार झाली आहे.






आयसीसी रँकिंगमध्ये भारताचा पाकला झटका


मागील 48 तासांच्या आत म्हणजेच 7 मे रोजी भारतीय क्रिकेट संघ कोणताही एकदिवसीय सामना न खेळता पुन्हा जुन्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडचा 102 धावांनी पराभव केला. या विजयानंतर बाबर आझमचा संघ क्रमवारीत नंबर वन ठरला. त्यानंतर भारतीय संघ तिसर्‍या क्रमांकावर घसरला होता आणि त्यामुळे पाकिस्तानने आनंद व्यक्त केला होता.


ऑस्ट्रेलिया पुन्हा पहिल्या क्रमांकावर


रविवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानला 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचा संघ एकदिवसीय क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर घसरला आणि ऑस्ट्रेलिया पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.


पाकिस्तानला पुन्हा नंबर वन होण्याची संधी


या मालिकेनंतर पुढील एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला पुन्हा अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. पाकिस्तानच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा झाली आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान 106 गुणांसह क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. न्यूझीलंडचा 1-4 असा पराभव केल्यानंतर पाकिस्तानकडे 112 गुण आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ICC Mens Test Rankings : कसोटी क्रिकेटमध्ये भारत 'जगात भारी'! ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टेस्टमध्ये अव्वल