PAK W vs Sri Lanka W,  Womens Asia Cup T20 2022 Semi Final 2: श्रीलंका महिला आणि पाकिस्तान महिला यांच्यात (Pakistan Women vs Sri Lanka Women) आज महिला आशिया चषक 2022 मधील दुसरा सेमीफायनल सामना खेळला गेला. सेल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium) खेळण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या संघाला अखेरच्या चेंडूवर तीन धावांची गरज होती. या चेंडूवर निदा दारनं फटका मारला. परंतु, पहिली धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात ती रनआऊट झाली. ज्यामुळं श्रीलंकेच्या संघानं हा सामना अवघ्या एका धावेनं जिंकला. महिला आशिया चषक 2022 च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा संघ भारताशी दोन हात करेल.


या सामन्यात श्रीलंकेच्या संघाची कर्णधार चमारी अटापट्टूनं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं निर्धारित 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 122 धावा केल्या. श्रीलंकेकडून हर्षिता मडवीनं 35, अनुष्का संजीवनीनं 26, निलाक्षी डी सिल्वानं 14 आणि हसिनी परेरानं 13 धावा केल्या. कर्णधार चमारी अटापट्टूनं 10 धावा केल्या. पाकिस्तानकडून नशरा संधूनं तीन विकेट्स घेतल्या आहेत. सादिया इक्बाल, निदा दार आणि आयमान अन्वर यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


ट्वीट- 






 


अखेरच्या षटकात श्रीलंकेची भेदक गोलंदाजी
दरम्यान, 123 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  पाकिस्तान महिला संघाला 6 विकेट्स गमावत फक्त 121 धावाच करता आल्या. त्यामुळं श्रीलंका संघानं हा सामना एक धावेनं जिंकत अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान मिळवला. पाकिस्तानच्या डावातील 18व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कर्णधार बिस्माह मारूफ 42 धावांवर बाद झाल्यानं सामन्याचं रुप बदललं. त्यानंतर 19व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही पाकिस्ताननं आणखी एक विकेट्स गमावली. अखरेच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना निदा दार फक्त एक धाव घेऊ शकली आणि रनआऊट झाली. तिनं या सामन्यात संघासाठी 26 धावांचं योगदान दिलं.


फायनलमध्ये भारतीय महिला श्रीलंकेशी भिडणार
या विजयानंतर श्रीलंका संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. श्रीलंका संघ शनिवारी (15 ऑक्टोबर) महिला आशिया चषक 2022च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या दुसऱ्या आणि उभय संघातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. आता अंतिम सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


हे देखील वाचा-


WIPL:  महिला आयपीएलसाठी बीसीसीआयचा खास प्लॅन; पुढच्या वर्षी मार्चमध्ये 5 संघांमध्ये रंगणार टी-20 लीगचा थरार