Virat Kohli 50th ODI Century : रनमशीन विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम आज वानखेडेवर मोडीत काढला. विशेष म्हणजे, त्यावेळी स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित होता. विराट कोहलीने शतकांचे अर्धशतक ठोकल्यानंतर स्टेडियममध्ये असणाऱ्या सचिन तेंडुलकरला अभिवादन केले. विराट कोहलीने 106 चेंडूमध्ये शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या साक्षीने नवा इतिहास रचला. विराट कोहलीने सचिनच्या समोरच वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. तेही सचिनपेक्षा कमी डावात त्याने हा पराक्रम केलाय. विराट कोहलीनेही सचिनच्या शतकांचा विक्रम मोडल्यानंतर मास्टर ब्लास्टरला मैदानातच अभिवादन केले. शतकांचे अर्धशतक ठोकल्यानंतर विराट कोहलीला त्याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्याने दिलेल्या प्रतिक्रिया सर्वांना भारावणारी आहे. 






काय म्हणाला विराट ?


ग्रेट-महान माणसाने नुकतंच माझे अभिनंदन केलं. हे सर्व एका स्वप्नासारखं वाटतंय. पण हे सत्य आहे आणि ते माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. आमच्यासाठी हा सर्वात मोठा सामना आहे. मी माझी भूमिका पार पाडलीच. पण माझ्यासोबतच्या सहकाऱ्यांनाही आपली कामगिरी चोख बजावता आली. माझी टीम जिंकणं हेच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे, हे मी वारंवार सांगत आलोय. एक बाजू लावून धरणं आणि शेवटपर्यंत खेळत राहणं ही जबाबदारी या स्पर्धेत माझ्यावर दिली आहे. परिस्थितीनुसार खेळणे आणि टीमच्या गरजेनुसार खेळणे हीच माझ्या सातत्यपूर्ण कामगिरीची गुरुकिल्ली आहे. शतकांचं अर्धशतक झळकावताना समोर साक्षात क्रिकेटचा देव अर्थात सचिनपाजी असणं हे स्वप्नवतच आहे. माझी आयुष्याची सोबती आणि माझा हिरो सगळे माझ्या समोर बसलेले होते. शिवाय वानखेडेवर बसलेले सगळे क्रिकेटचे चाहते...हे सगळं शब्दात मांडणं कठीण आहे.  इथवर मजल मारण्याचं बहुतांश क्रेडिट हे श्रेयस अय्यरला द्यावंच लागेल. शुभमन गिलला क्रॅम्प आल्यानंतर अय्यर जबरदस्त खेळला. के एल राहुलने तर त्याच्या स्टाईलने चौकारांची बरसात करुन, शेवट केला. 400 चा टप्पा गाठणं जबराट आहे.










विराट कोहलीचे जिगरबाज शतक -
रोहित शर्माने दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर विराट कोहलीने भारातची धावसंख्या वाढवली. सुरुवातीला एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत आधी मोठी भागिदारी केली. गिल क्रॅम्प आल्यामुळे मैदानाबाहेर गेला. पण त्यानंतर विराट कोहलीने श्रेयस अय्यरच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने शुभमन गिल याच्यासोबत 93 धावांची भागिदारी केली. त्यानंतर अय्यरसोबत त्याने 128 चेंडूत झटपट 163 धावांची भागिदारी केली. विराट कोहली आणि अय्यर यांनी भारताची धावगती वाढण्याचे काम केले. विराट कोहलीने 113 चेंडूत 117 धावांची जिगरबाज खेळी केली. यामध्ये 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने या शतकासह सचिन तेंडुलकरच्या वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडीत काढला.