SA Vs AUS, Match Highlights : कोलकात्यामध्ये रंगलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा तीन विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या माफक आव्हनाचा कांगारुंनी यशस्वी पाठलाग केला. आता रविवारी, 19 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचा संघ भारतासोबत फायनलमध्ये भिडणार आहे.. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. दरम्यान, आफ्रिकेच्या फिल्डर्सनी गचाळ फिल्डिंग करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सात ते आठ जीवनदान दिले. त्याचा मोठा फटका आफ्रिकेला बसला. 


ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे.  आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने पाचवेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 1987, 1999, 2003, 2007 and 2015 हे विश्वचषक ऑस्ट्रेलियाने उंचावले आहेत.1975 आणि 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा चौथ्यांदा पराभव झालाय. तर एकवेळा सामना बरोबरीत सुटला होता. दक्षिण आफ्रिकेने पाच वेळा उपांत्य फेरी गाठली, पण त्यांना एकदाही फायनलमध्ये प्रवेश करता आला नाही. 


आफ्रिकेने दिलेल्या 213 धावांच्या माफक आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने वेगाने पाठलाग केला. ट्रेविस हेड आणि डेविड वॉर्नर यांनी आफ्रिकेची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी 6.1 षटकात 60 धावांचा पाऊस पाडला. डेविड वॉर्नरने चार षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 18 चेंडूत झटपट 29 धावा चोपल्या. डेविड वॉर्नरला एडन मार्करम याने तंबूचा रस्ता दाखवला. वॉर्नर बाद झाल्यानंतर मिचेल मार्शही फार काळ टिकला नाही. त्याला खातेही उघडता आले नाही. रबाडाच्या चेंडूवर मार्श गोल्डन डकचा शिकार झाला. दोन विकेट गेल्या तरी ट्रेविस हेडची फटकेबाजी सुरुच होती. 


ट्रेविस हेड याला स्टिव्ह स्मिथ याने चांगली साथ दिली. फिरकीला मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर ट्रेविस हेड याने वेगवान धावा जमवल्या. हेड याने 48 चेंडूत 62 धावांची खेळी केली. यामध्ये 9 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. हेड आणि स्मिथ यांच्यामध्ये 45 धावांची भागिदारी झाली. हेड बाद जाल्यानंतर स्मिथ आणि लाबुशेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये 45 धावांची भागिदारी झाली. लाबुशेन 18 धावा काढून बाद झाला. लाबुशेनने 32 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 18 धावा जमवल्या. लाबुशेन बाद झाल्यानंतर मॅक्सवेलही लगेच तंबूत परतला. त्याला फक्त एक धाव करता आली.  मॅक्सवेल गेल्यानंतर स्मिथ आणि इंग्लिंश यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांतर स्मिथ आणि इंग्लिश यांच्यामध्ये 37 धावांची भागिदारी झाली. पण मोक्याच्या क्षणी स्मिथ तंबूत परतला. स्मिथने 62 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 30 धावाचे योगदान दिले. स्मिथ परतल्यानंतर स्टार्क आणि इंग्लिंश यांच्यामध्ये छोटेखानी भागिदारी झाली.  इंग्लिंश आणि स्टार्क यांनी 19 धावा जोडल्या.  जोश इंग्लिश 49 चेंडूत 28 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांनी उर्वरित काम केले. दरम्यान, आफ्रिकेकडून तरबेज शम्सी, केशव महाराज आणि एडन मार्करम यांनी भेदक मारा केला. पण इतर गोलंदाजांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. धावा रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना अपयश आले. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दहा षटकातच धावांचा पाऊस पाडला होता. 


मिलर एकटाच लढला - 


ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यापुढे आफ्रिकेची फलंदाजांनी गुडघे टेकले. डेविड मिलरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाचा सामना एकट्या डेविड मिलर याने केला. मिलरच्या झंझावती शतकी खेळीच्या बळावर आफ्रिकेनं 212 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यापुढे आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. 24 धावांत आफ्रिकेचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. फ्रिकेचा डाव लवकर संपणार का? असेच वाटत होते. पण डेविड मिलर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला एकटा नडला. आधी खेळपट्टीवर स्थिरावला. त्यानंतर गोलंदाजांचा समाचार घेतला. मिलर याने क्लासेन याच्यासोबत 95 धावांची भागिदाी केली. कर गॅराल्ड कोएत्ज़ी याच्यासोबत 53 धावा जोडल्या. त्याशिवाय आफ्रिकेला एकही मोठी भागिदारी करता आली नाही. डेविड मिलर याला क्लासेन आणि गॅराल्ड कोएत्ज़ी यांनी साथ दिली... पण त्या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही.  डेविड मिलर याने 116 चेंडूत 5 षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 101 धावांची शानदार खेळी केली.