IND Vs NZ, Match Highlights : विराट कोहलीच्या 95 धावांच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव केला. न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचे आव्हान भारताने सहा विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. विराट कोहलीने 95, रोहित शर्माने 46, श्रेयस अय्यरने 33 आणि रविंद्र जाडेजाने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. यंदाच्या विश्वचषकातील भारताचा हा सलग पाचवा विजय होय. न्यूझीलंडचा विजयरथ भारताने थांबवला आहे. आता गुणतालिकेत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या विजयासह भारताने सेमीफायनलमधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
विराट कोहलीची झुंज -
रनमशीन विराट कोहलीने पुन्हा एकदा मॅच विनिंग खेळी केली. विराट कोहलीने सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांविरोधात संयमी फलंदाजी करत एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला. विराट कोहलीने श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि रविंद्र जाडेजा यांच्यासोबत अर्धशतकी भागीदारी केली. विराट कोहलीने 104 चेंडूमध्ये 95 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीने दोन षटकार आणि आठ चौकार ठोकले.
रोहित शर्माची आक्रमक सुरुवात -
274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 11 षटकात 71 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 40 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार लगावले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलही माघारी परतला. शुभमन गिल याने 31 चेंडूमध्ये पाच चौकारांच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले.
अय्यर-राहुलची चांगली सुरुवात, पण...
शुभमन गिल आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीने अय्यर आणि केएल राहुल यांच्यासोबत चांगली भागिदारी केली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यामध्ये चौथ्या विकेटसाठी 49 चेंडूत झटपट 52 धावांची महत्वाची भागीदारी झाली. तर राहुल आणि विराट कोहली यांच्यामध्ये पाचव्या विकेटसाठी 64 चेंडूमध्ये 54 धावांची भागीदारी झाली. श्रेयस अय्यरने 29 चेंडूमध्ये सहा चौकारांच्या मदतीने 33 धावांचे महत्वाचे योगदान दिले. तर केएल राहुल याने 35 चेंडूमध्ये तीन चौकारांच्या मदतीने 27 धावा जोडल्या. राहुल आणि अय्यर यांनी चांगली सुरुवात केली, पण त्यांना या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही.
विराट-जाडेजा यांच्यामध्ये मॅचविनिंग भागीदारी -
सूर्यकुमार यादव दोन धावांवर धावबाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. पण विराट कोहलीने रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहली आणि जाडेजा यांच्यामध्ये अर्धशतकी भागीदारी झाली. विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा यांनी 83 चेंडूमध्ये 78 धावांची भागीदारी केली. कठीण परिस्थितीमध्ये दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. रविंद्र जाडेजाने नाबाद 39 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने तीन चौकार आणि एका षटकारांचा समावेश होता. जाडेजाने मॅचविनिंग चौकार लगावला. न्यूझीलंडकडून लॉकी फर्गुसन याने 8 षटकात 63 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. ट्रेंट बोल्ट, मॅट हेनरी आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.