World Cup 2023, IND vs ENG:  विश्वचषकात टीम इंडियाने सलग सहाव्या विजयाची नोंद केली. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. भारताने 229 धावांच्या माफक आव्हानाचा यशस्वी बचाव केला. इंग्लंडचा संपूर्ण संघ 129 धावांत गारद झाला. रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शामी आणि जसप्रीत बुमराह यांनी भेदक मारा केला. शामीने चार तर बुमराहने तीन विकेट घेतल्या.  या विजयासह टीम इंडियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलेय. इंग्लंडचा विश्वचषकातील पाचवा पराभव होय. या पराभवासह इंग्लंडचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलेय. 


भारताने दिलेल्या 230 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अतिशय खराब झाली. एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. जॉनी बेअरस्टो आणि डेविड मलान यांनी सिराजच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. पण जसप्रीत बुमराहने पहिला धक्का दिला. जसप्रीत बुमराहने डेविड मलान याला 16 धावांवर तंबूत पाठवले. डेविड मलान याने 17 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 16 धावांची खेळी केली. डेविड मलाननंतर जो रुटही लगेच तंबूत परतला. त्याला खातेही उघडता आले नाही. जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर रुट बाद झाला. रुटनंतर बेन स्टोक्सही तंबूत परतला. त्यालाही खाते उघडता आले नाही. जसप्रीत बुमराहानंतर मोहम्मद शामी यानेही इंग्लंडला लागोपाठ दोन धक्के दिला. आधी बेन स्टोक्सला बाद केले. त्यानंतर जॉनी बेअरस्टो यालाही तंबूचा रस्ता दाखवला. इंग्लंड बिनबाद 30 धावांवरुन 4 बाद 39 अशी दैयनीय अवस्था झाली होती. यामध्ये शामी आणि बुमराह यांचा सिंहाचा वाटा होता. जॉनी बेअरस्टो याने 23 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 14 धावांचे योगदान दिले. 


कर्णधार जोस बटलर याने मोईन अलीच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण कुलदीप यादवने जोस बटलर याला त्रिफाळाचीत केले. जोस बटलर 23 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने फक्त 10 धावा करु शकला. 52 धावांत उंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. कर्णधार माघारी परतल्यानंतर मोईन अलीने लियाम लिव्हिंगस्टनच्या साधीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडीही जमली होती, पण मोहम्मद शामी याने मोईन अली याला तंबूत पाठवले. मोईन अली याला 31 चेंडूत फक्त 15 धावा करता आल्या. यामध्ये एकही चौकार अथवा षटकाराचा समावेश नाही. मोईन अली माघारी परतल्यानंतर ख्रिस वोक्स आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनीही भागिदारीचा प्रयत्न केला, पण जाडेजाने कमाल केली. जाडेजाने ख्रिस वोक्स याला तंबूचा रस्ता दाखवला. वोक्स याने 20 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन याचा अडथळा कुलदीप यादवने दूर केला. कुलदीप यादवने लिव्हिंगस्टनला 27 धावांवर बाद केले. लिव्हिंगस्टोन याने 46 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या. 


डेविड मलान आणि जॉनी बेअरस्टो यांनी दिलेली सलामी इंग्लंडकडून सर्वात मोठी भागिदारी होय. या जोडीने 29 चेंडूमध्ये 30 धावांची भागिदारी केली. त्यानंतर मोईन अली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांच्यामध्ये 48 चेंडूमध्ये 29 धावांची भागिदारी झाली. इंग्लंडकडून एकही अर्धशतकी भागिदारी झाली नाही. त्यामुळेच इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला. अखेरीस अदील रशीद आणि डेविड विली यांनी 28 चेंडूत 24 धावांची भागीदारी केली. रशीदने 13 तर डेविड विलीने 16 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शामीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर बुमराहने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव याला दोन विकेट मिळाल्या तर जाडेजाना एका फलंदाजाला तंबूत पाठवले.