Shaheen Shah Afridi On IND vs PAK : विश्वचषकात भारताविरोधात होणाऱ्या सामन्यापूर्वी (World Cup 2023, IND vs PAK ) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने हुंकार भरली आहे. भारताच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवणार, असे वक्तव्य शाहीन आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) केले आहे. शाहीन आफ्रिदीचे हे वक्तव्य चर्चेत आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर सामना होत आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हायव्होल्टेज सामन्यापूर्वी शाहीन आफ्रिदी याच्या वक्तव्याने कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे. शाहीनच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली असेल.


शाहीन आफ्रिदी पहिल्यांदाच भारतात खेळण्यासाठी आला आहे.  शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सामन्यात पाच विकेट घेणार असल्याचे सांगितले.  शाहीन आफ्रदीने आतापर्यंत 46 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने दोनदा 5 विकेट्स घेतल्या आहेत. शाहीन आफ्रिदी अहमदाबादच्या खेळपट्टीवर भारताविरोधात नव्या चेंडूचा वापर कसा करतो, याकडे नजरा लागल्या आहेत. 


विश्वचषकाच्या पहिल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानचे गोलंदाज अपयशी ठरले आहेत. हसन अली याने भेदक मारा केला. पण शाहीन फ्लॉपच गेला. शाहीनला दोन्ही सामन्यात फक्त 1-1 विकेट मिळाली. मात्र नव्या चेंडूने तो भारताविरुद्ध प्रभावी ठरु शकतो. 






भारताविरोधात शाहीनची कामगिरी कशी राहिली ?


वनडे विश्वचषकाच्या आधी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकात दोन वेळा सामना झाला होता. यामधील पहिल्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने भेदक मारा केला होता. पहिल्या सामन्यात शाहीनने 10 षटकात केवळ 35 धावा देत 4 बळी घेतले होते. त्यामध्ये त्याने विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा या फलंदाजांचा समावेश होता. मात्र पावसामुळे सामना रद्द झाला.






आशिया चषकाच्या सुपर 4 सामन्यात शाहीन आफ्रिदी भारताविरुद्ध पूर्णपणे प्रभावहीन ठरला होता. त्याला भारताविरोधात फक्त एक विकेट मिळाली होती. रोहित शर्मा आणि कंपनीने शाहीनची धुलाई केली होती. शाहीन आफ्रिदीच्या 10 षटकात भारताने तब्बल 79 धावा वसूल केल्या होत्या. शाहीन आफ्रिदीने भारताविरोधात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यामध्ये 31 च्या सरासरीने 5 विकेट घेतल्या आहेत. 


 भारत आठव्या विजयासाठी सज्ज -  


विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 14 ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर दोघांमध्ये लढत होईल. या सामन्याकडे जगभरातील क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. वनडे विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तानविरोधात आतापर्यंत अजेय आहे. भारताने पाकिस्तानला सातवेळा पराभूत केले आहेत. पाकिस्तानचा आठवा पराभव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.