World Test Championship Final : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात (SL vs NZ) नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवला आहे. सामन्याच्या अखेरच्या डावात संघाचा माजी कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) याने ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर किवी संघाने हा विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयाचा थेट फायदा भारतीय संघाला झाला असून भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. श्रीलंकेचा संघ पराभूत झाल्यामुळे WTC फायनलच्या गुणतालिकेत खालच्या स्थानावर गेल्यामुळे भारत फायनलसाठी पात्र ठरला आहे.
कशी होती दोघांची गोलंदाजी?
पहिल्या डावात गोलंदाजी करताना न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने 64 धावांत 5 बळी घेतले. याशिवाय मॅट हेन्रीने 80 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मायकेल ब्रेसवेल एक विकेट घेण्यात यशस्वी ठरला. दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून असिता फर्नांडोने शानदार गोलंदाजी सादर केली. त्याने 85 धावा देऊन 4 बळी घेतले. याशिवाय लाहिरु कुमाराने 76 धावांत 3 बळी घेतले. तर कसून रजिताने 2 आणि प्रभात जयसूर्याला 1 विकेट मिळाली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. याशिवाय हेन्रीने 3 आणि टीम साऊथीने 2 विकेट्स घेतल्या. सामन्याच्या शेवटच्या डावात श्रीलंकेकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, पण गोलंदाज संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. या डावात श्रीलंकेचा गोलंदाज असिता फर्नांडोने 63 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी प्रभात जयसूर्याने 2 बळी घेण्यात यश मिळवले. याशिवाय लाहिरु कुमारा आणि कसून रजिताने 1-1 बळी त्यांच्या खात्यात जमा केले.