India vs New Zealand Champions Trophy 2025 Final : दुबईमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात किवींनी 251 धावा केल्या. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता होण्यासाठी भारताला 252 धावा कराव्या लागतील. एकेकाळी असे वाटत होते की न्यूझीलंडचा संघ 270-280 पर्यंत सहज पोहोचेल, पण असे काही झाली नाही. 3-4 कॅच सोडले तरीही, न्यूझीलंडविरुद्ध भारतीय फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी करत आणि त्यांना 251 धावांपर्यंत रोखले. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी किवींना खूप चांगली सुरुवात करून दिली. रवींद्रने 29 चेंडूत 37 धावांची तुफानी खेळी खेळली. केन विल्यमसन फक्त 11 धावा काढून बाद झाला, परंतु डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील 57 धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला सामन्यात परत येण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली.
डॅरिल मिशेल-मायकेल ब्रेसवेलने ठोकले अर्धशतक
न्यूझीलंड मधल्या फळीतील फलंदाजही काही खास कामगिरी करू शकले नाहीत. फक्त डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनीच शानदार खेळी केली. डॅरिलने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात हळू अर्धशतक झळकावले जे 91 चेंडूत होते. त्याच्या डावात त्याने 100 चेंडूंचा सामना केला आणि 63 धावा केल्या. शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने एक शानदार झेल घेतला. ब्रेसवेलने 52 धावा केल्या. इतर फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, टॉम लॅथमने 14 आणि ग्लेन फिलिप्सने 34 धावा केल्या.
भारतीय फिरकीपटूंनी केला कहर
या खेळपट्टीवर फिरकीपटूंचे वर्चस्व होते. वरुण चक्रवर्तीने पहिल्या विकेटने सुरुवात केली. यानंतर, जणू काही विकेट पडण्याची एकच झुंबड उडाली. चक्रवर्तीने सामन्यात यंग आणि ग्लेन फिलिप्सला आऊट करून 2 विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनेही 2 विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने लॅथमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेगवान गोलंदाजांमध्ये शमीने 1 बळी घेतला, पण शमी महागडा गोलंदाज ठरला त्याने 9 षटकात 74 धावा दिल्या.