Netherlands ODI World Cup 2023 : विश्वचषकाला अवघे काही तास शिल्लक आहेत. दहा संघामध्ये राउंट रॉबिन पद्धतीने स्पर्धा होत आहे. दोन वेळच्या विश्वविजेता वेस्ट इंडिजचा संघ यंदा या स्पर्धेत सहभागी नाही. नेदरलँड्सच्या संघाने पात्रता फेरीत बलाढ्य वेस्ट इंडिजचे आव्हान संपवले होते. तब्बल 12 वर्षांनतर नेदरलँड्सचा संघ विश्वचषकात खेळत आहेत. नेदरलँड्स संघाने पाचव्यांदा विश्वचषकासाठी क्वालिफाय केलेय. 2015 आणि 2019 मध्ये नेदरलँड्स संघाला विश्वचषकात क्वालिफाय करता आले नव्हते. पण यंदा नेदरलँड्स संघाने दमदार कामगिरी करत विश्वचषकाचे तिकिट मिळवले. दहा संघामध्ये नेदरलँड्सचा संघ एकमेव आहे, जो 12 वर्षांनतर विश्वचषकात उतरतोय. 


नेदरलँड्स संघाने पात्रता फेरीत दमदार कामगिरी केली. क्वालिफायर फेरीमध्ये नेदरलँड्सच्या संघाने अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला. सुपर ओव्हरच्या सामन्यात नेदरलँड्सने बलाढ्य वेस्ट इंडिजला दणका दिला. त्यानंतर स्कॉटलँडचा पराभव करत विश्वचषकाचे तिकिट मिळवले. यंदाच्या विश्वचषकात नेदरलँड्सचा पहिला सामना सहा ऑक्टोबर रोजी बलाढ्य पाकिस्तानविरोधात होत आहे. 


विश्वचषकातील कामगिरी - 


नेदरलँड्स संघाने पाचव्यांदा विश्वचषकात क्वालिफाय केले आहे. 1996 मध्ये नेदरलँड्स  संघाने पहिल्यांदा विश्वचषकाचे तिकिट मिळवले होते. त्यानंतर दोन विश्वचषकात त्यांना पात्रता फेरीतच समाधान मानावे लागले. 2003, 2007 आणि 2011 अशा सलग तीन विश्वचषकासाठी नेदरलँड्स संघाने प्रवेश मिळवला होता. विश्वचषक खेळण्याची यंदाची ही त्यांची पाचवी वेळ असेल. पण आतापर्यंत नेदरलँड्स संघाला साखळी फेरीतून पुढे जाता आले नाही. नेदरलँड्स संघाला विश्वचषकात फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. त्यांनी विश्वचषकात स्कॉटलंड आणि नामीबिया या संघांना पराभूत केलेय. 2003 आणि 2007 च्या विश्वचषकात एक एक सामना जिंकता आलाय. आतापर्यंत चार विश्वछषकात नेदरलँड्स संघाने 20 सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांना 18 पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतात झालेल्या 2011 च्या विश्वचषकात नेदरलँड्स संघाला सहा सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. यंदाचा विश्वचषकही भारतात होणार आहे, साखळी नऊ सामने होतील, त्यापैकी किती सामन्यात नेदरलँड्स बाजी मारणार... याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.


यंदाच्या विश्वचषकात नेदरलँड्सचे शिलेदार -


स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डौड, बास डी लीड, विक्रम सिंग, तेजा निदामनुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन एकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सीब्रँड एंजेलब्रेच.


5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ  - 


5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.