Dipendra Singh Airee Biography : नेपाळच्या दीपेंद्र सिंह ऐरी याने तब्बल सोळा वर्षानंतर युवराज सिंह याचा मोठा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा युवराजचा विक्रम दीपेंद्र याने मोडला आहे. दीपेंद्र याने आशियाई क्रीडा स्पर्धेत फक्त ९ चेंडूत अर्धशतक ठोकले. युवराज सिंह याने १६ वर्षांपूर्वी टी२० विश्वचषक स्पर्धेत फक्त १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. हा विक्रम आज मोडीत निघाला.  आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपेंद्र याने मंगोलियाच्या गोलंदाजाची धुलाई केली. त्याने अवघ्या 10 चेंडूत नाबाद 52 धावांची खेळी केली. युवराजचा विक्रम मोडणाऱ्या दीपेंद्र याची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा सुरु आहे. 


दीपेंद्र सिंह ऐरी याचं वय फक्त  23 वर्ष इतके आहे.  24 जानेवारी, 2000 रोजी त्याचा जन्म झाला होता.  दीपेंद्र नेपाळ संघात मध्यक्रम फलंदाजीच म्हणून खेळतोय.  दीपेंद्र याने फक्त 17  व्या वर्षी नेपाळच्या सिनिअर संघात पदार्पण केले होते.   दीपेंद्र याने 2016 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कपही खेळला आहे. दीपेंद्र ऐरी याला नेपाळमध्ये पॉवरहिटर म्हणून ओळखले जाते. वेगाने धावा काढणे, हे त्याचे कौशल्य आहे. केवळ फलंदाजीतच नाही तर क्षेत्ररक्षणातही तो चपळ आहे. पॉवर प्लेमध्ये सर्कलमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये सीमेजवळ असे दीपेंद्र सर्वत्र क्षेत्ररक्षण करताना सक्रिय दिसतो. उत्कृष्ट फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही तो संघासाठी महत्त्वाचे योगदान देतो.






आंतरराष्ट्रीय खेळण्याचा अनुभव - 


दीपेंद्र नेपाळसाठी वनडे आणि टी20 दोन्ही प्रकारात खेळतो.  नेपाळच्या अनुभवी खेळाडूमध्ये दीपेंद्र याचे नाव घेतले जाते.  दीपेंद्रने आतापर्यंत 52 वनडे आणि 45 टी20 सामने खेळला आहे.  वनडे सामन्यातील 51 डावात दीपेंद्र याने 889 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.  त्याशिवाय टी २० च्या 40 डावात 37.25 च्या सरासरीने आणि 136.84 च्या स्ट्राइक रेटने 1155 धावा केल्या. त्यामध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकांचा समावेश आङे. तर गोलंदाजीत करताना वनडेमध्ये 36 आणि टी20 मध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. 


फर्स्ट क्लास क्रिकेटमधील आकडे कसे  - 


दीपेंद्र याने फक्त एक फर्स्ट क्लास सामना खेळला आहे. या सामन्यात त्याला फक्त एक धाव काढता आली.  तर 73 लिस्ट-ए सामन्यात दीपेंद्र याने 1345 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीत 44 विकेट घेतल्या आहेत.