Nagpur Police Stopped Raghu  नागपूर : भारताच्या यंग ब्रिगेडनं इंग्लंडला पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 4-1 असं पराभूत केलं. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघ एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. नागपूरमध्ये उद्या (6 फेब्रुवारी) भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ नागपूरमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाचे खेळाडू हॉटेल रॅडिसन ब्ल्यूमध्ये मुक्कामाला जात असताना एक मजेशीर प्रसंग घडला. नागपूर पोलिसांनी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील राघवेंद्र द्विवेदी म्हणजेच रघू याला चाहता समजून हॉटेलमध्ये जाण्यापासून रोखलं. रघूने पोलिसांशी थोडा वेळ चर्चा केल्यानंतर पोलिसांना त्यांची चूक लक्षात आली मग त्यांनी त्याला जाऊ दिले. रघू पुढं निघून जाताच रोहित शर्मा तिथं पोहोचला. तो  येण्यापूर्वी हा प्रसंग घडला. 


नेमकं काय घडलं?


रॅडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर नागपूर पोलिसांनी भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा सदस्य रघू याला अडवलं. रघू हा कोणीतरी चाहता असून हॉटेलमध्ये जायचा प्रयत्न करतो, असं पोलिसांना वाटलं. एक नव्हे तर तीन तीन पोलिसांनी त्याला अडवलं. रघूनं त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. पोलिसांना ओळख पटवून दिली. यावेळी या सर्व प्रकाराचं व्हिडीओ शुटींग करणाऱ्यांच्या नजरेतून हा प्रकार सुटू शकला नाही. एक जण म्हणाला  अरे कोच है वो, टीम के साथ है, बस से उतरा है.  रघू यानं पोलिसांना ओळख पटवून दिल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्याचा मार्ग  मोकळा झाला. रघू म्हणजेच राघवेंद्र द्विवेदी पुढं निघून जाताच भारताचा कॅप्टन रोहित शर्मा तिथं दाखल झाला. 


रघू उर्फ राघवेंद्र द्विवेदी कोण आहे? 


रघू भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून तो संघासोबत आहे. भारतीय फलंदाजी मजबूत करण्यामध्ये त्यचं महत्त्वाचं योगदान आहे. रघूला क्रिकेटमध्ये कामगिरी करुन दाखवायची होती. मात्र, हाताला दुखापत झाल्यानंतर तो प्रशिक्षणाकडे वळला. थ्रोडाऊनमध्ये तो स्पेशालिस्ट असल्यानं आणि प्रामुख्यानं 150 किमी/तास या वेगानं गोलंदाजी करत असल्यानं कर्नाटकच्या टीमचं लक्ष त्यानं वेधून घेतलं. 


भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं रघूला मोठा ब्रेक दिला. रघू ला भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये घेण्याचा सूचना सचिन तेंडुलकरनं दिल्या होत्या. त्यानुसार 2011 पासून रघू भारतीय क्रिकेट संघासोबत आहे.


दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामने 6 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला होणार आहेत. 






इतर बातम्या :