MPL 2023 : महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत क्वालिफायर 1 लढतीत धीरज फटांगरेच्या उपयुक्त 46 धावांच्या खेळीसह विजय पावले याने (2-22) केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने कोल्हापूर टस्कर्स संघाचा डक वर्थ लुईस नियमानुसार 4 धावांनी पराभव करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. 
 
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीला साखळीतील एकमेव पराभव कोल्हापूरविरुद्धच पत्करावा लागला होता. त्या सामन्यात कोल्हापूरच्या अंकित बावणेने शतकी खेळी केली होती. सलामवीर ऋषिकेश सोनावणेला आत्मन पोरेने तिसऱ्याच चेंडूवर झेल बाद केले. ऋषिकेशला खाते देखील उघडता आले नाही. धीरज फटांगरेने आक्रमक सुरुवात करत 26 चेंडूत 46 धावांची खेळी केली. त्यात 6 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. प्रीतम पाटील 4 धावांवर असताना आक्रमक फटका मारताना आत्मन पोरेच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार अझीम काझी(1 धाव)ला मागील सामन्यात हॅट्रिक कामगिरी करणाऱ्या मनोज यादवने झेल बाद करून रत्नागिरी संघाला तिसरा धक्का दिला. रत्नागिरीची 6 षटकात 3 बाद 44 अशी धावसंख्या असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. पावसाच्या विश्रांतीनंतर दोन्ही संघातील सामना प्रत्येकी 15 षटकांचा करण्यात आला. 


विश्रांतीनंतर रत्नागिरीच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. किरण चोरमलेने 22 चेंडूत 1चौकार व 3 षटकारासह 34 धावा चोपल्या. धीरज व किरण या जोडीने चौथ्या विकेटसाठी 31 चेंडूत 55 धावांची भागीदारी करून धावगती वाढवली. किरण चोरमलेला फिरकीपटू अक्षय दरेकरने त्रिफळा बाद, तर श्रेयश चव्हाणने धीरज फटांगरेला झेल बाद करून रत्नागिरीच्या जम बसलेल्या फलंदाजांना बाद केले व त्यांच्या धावगतीस ब्रेक लावला. 13 षटक सुरु असताना पुन्हा पाऊस आला. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर निखिल नाईक(11धावा), साहिल चुरी(5धावा), रोहित पाटील(1धाव) हे झटपट झाले. त्यानंतर दिव्यांग हिंगणेकरने 17 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह नाबाद 25 धावांची खेळी करत संघाला 15 षटकात 8बाद 136 धावांचे आव्हान उभे करून दिले. पण 6व्या षटकानंतर आलेल्या पावसाच्या व्यत्ययामुळे डक वर्थ लुईस नियसमानुसार कोल्हापूर संघाला 15 षटकात 135 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. कोल्हापूर टस्कर्सकडून आत्मन पोरे(2-23), मनोज यादव(2-25), निहाल तुसमद(1-22), श्रेयश चव्हाण(1-22) यांनी सुरेख गोलंदाजी केली.


135 धावांचे आव्हान घेऊन उतरलेला कोल्हापूर टस्कर्स संघ 1.5  षटकात बिनबाद 18 धावा असताना पुन्हा पाऊस सुरु झाला. यात केदार जाधव नाबाद ९ व अंकित बावणे नाबाद 8 धावांवर खेळत होता. पाऊस सुरूच राहिल्यामुळे आज हा सामना सकाळी घेण्यात आला. केदार जाधवने जोरदार फटकेबाजी  करत 37  चेंडूत 55 धावांची खेळी केली. त्यात 4 षटकार व 2 चौकारांचा समावेश होता. त्याला अंकित बावणेने 18 धावा काढून साथ दिली. या सलामीच्या जोडीने 32 चेंडूत 46 धावांची भागीदारी केली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या अंकितला रत्नागिरीच्या अझीम काझीने धावचीत बाद केले व संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर केदार जाधवने साहिल औताडे(20धावा)च्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी 28 चेंडूत 42 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. पण केदार जाधवला मोक्याच्या क्षणी रत्नागिरीच्या विजय पावलेने झेल बाद करून मोठा अडसर दूर केला. त्यानंतर सिद्धार्थ म्हात्रे(13 धावा), नौशाद शेख(3धावा), तरणजित ढिलोन(नाबाद 10) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. रत्नागिरीच्या विजय पावले(2-22), अझीम काझी(1-18)यांनी अचूक गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.   


सविस्तर निकाल:
रत्नागिरी जेट्स: 15 षटकात 8बाद 136धावा (धीरज फटांगरे 46(26,6x4,1x6), किरण चोरमले 34(22,1x4,3x6), दिव्यांग हिंगणेकर नाबाद 25, निखिल नाईक 11,  आत्मन पोरे 2-23, मनोज यादव 2-25, निहाल तुसमद 1-22, श्रेयश चव्हाण 1-22) वि.वि. कोल्हापूर टस्कर्स: 15 षटकात 5बाद 130 धावा(केदार जाधव 55(37,2x4,4x6), साहिल औताडे 20(16,2x4), अंकित बावणे 18, सिद्धार्थ म्हात्रे 13, तरणजित ढिलोन नाबाद 10, विजय पावले 2-22, अझीम काझी 1-18); सामनावीर-विजय पावले; रत्नागिरी जेट्स संघ डक वर्थ लुईस नुसार 4 धावांनी विजयी.