माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काल (7 जुलै) आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने आयसीसीपासून बीसीसीआय पर्यंत, आयपीएलचे संघ, माजी खेळाडू आणि विद्यमान खेळाडूंनी धोनीला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. माजी सलामीवीर आणि सध्याचे दिल्लीचे खासदार गौतम गंभीर धोनीला कशा शुभेच्छा देतात याची सर्वांना उत्सुकता होती. कारण गंभीर आणि माजी कर्णधार धोनी यांच्यातील संबंध कधीही सौहार्दपूर्ण नव्हते. गंभीरचे सोशल मीडिया अकाउंट तपासल्यानंतर धोनीला त्याने कुठल्या शुभेच्छा दिल्या नसल्याचे समोर आले. पण गंभीरने फेसबुकवर आपला कव्हर फोटो अपडेट केल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली.
धोनीच्या वाढदिवसानिमित्त, गंभीरने सर्वप्रथम 2011 च्या श्रीलंकेविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात स्वत: चा एक फोटो शेअर केला होता, ज्यात तो अर्धशतक झळकावल्यानंतर प्रेक्षकांचे अभिनंदन स्वीकारत आहे. पण नंतर त्याने हा फोटो बदलून दुसरा फोटो टाकला. गंभीरची ही कृती अनेक चाहत्यांना खटकल्याने यावर कॉमेंट्स करायला सुरुवात केली.
गंभीरचे वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात केवळ 3 धावांनी शतकी हुकले
2011 च्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गंभीरने 97 धावांची खेळी करुन सामना जिंकून 28 वर्षांनंतर विजेतेपद जिंकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. श्रीलंकेकडून मिळालेल्या 276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय संघाची अवस्था 21 धावांवर दोन बाद अशी झाली होती. अशा परिस्थितीत गंभीरने युवा विराट कोहलीच्या साथीने तिसर्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. यानंतर चौथ्या विकेटसाठी धोनीबरोबर मिळून 100 हून अधिक धावांची भागीदारी करून संघाचा विजयाचा मार्ग सोपा केला होता. यानंतर आलेल्या कर्णधार धोनीने 91 धावांवर संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
त्या फोटोमुळे चाहते विभागेल..
धोनीच्या वाढदिवसानिमित्त चाहते दिवसभर धोनीचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत होते. यात 2011 च्या वर्ल्डकपच्या फोटोंचाही समावेश होता. अशा स्थितीत गंभीरने केवळ त्याचा फोटो टाकणे हे चाहत्यांना पचले नाही. त्यामुळेच चाहत्यांनी गंभीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली. “भारतीय क्रिकेटमधील तुमच्या योगदानाबद्दल आम्हाला चांगली माहिती आहे. मात्र, आपल्या पीआर टिमलाच यावर शंका आहे, त्यामुळेच या तारखेला विशिष्ट फोटो पोस्ट करण्यात आला आहे. आपण यापेक्षा चांगले आहात आणि आम्हाला ते माहित आहे. तरुण पिढीला तुमच्या डिजिटल माध्यमावरुन वेगळा संदेश जाण्याची शक्यता आहे, अशी टिप्पणी एका वापरकर्त्याने गंभीरच्या सोशल मीडियावरील कव्हर फोटोवर केली आहे.