Border Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. नागपुरात गुरुवार म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होणार आहे. या WTC गुणतालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यासाठी चाहत्यांमध्येही उत्साह कमालीचा आहे. नागपूर कसोटीसाठी आतापर्यंत सुमारे 40 हजार तिकिटांची विक्री झाली आहे, यावरुन अंदाज लावता येईल की क्रिकेटप्रेमींमध्ये किती मोठ्या प्रमाणात उत्साह आहे.
पहिला कसोटी सामना नागपुरात रंगणार
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण त्यापूर्वी दोन्ही संघांना पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घ्यायची आहे. भारतीय संघ यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशिवाय मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघात जोश हेडलवूड आणि मिचेल स्टार्कसारखे नामवंत वेगवान गोलंदाज नसतील. याशिवाय अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचे खेळणे संशयास्पद मानले जात आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?
सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "संघनिवड ही एक समस्या आहे आणि कारण सध्या असं दिसून येतं आहेकी बरेच खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. सांघिक दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे, आम्हाला प्रत्येक खेळपट्टी पाहावी लागेल आणि सर्वोत्तम अंतिम 11 निवडावे लागेल. आम्ही यापूर्वीही असंच करत आलो आहोत आणि भविष्यातही असच करू.
ईशान कि केएस भरत कोणाला मिळणार संधी?
नागपूर कसोटीसाठी टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये केएस भरतचा समावेश करू शकते. तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 135 डावांमध्ये 4707 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 शतकं आणि 27 अर्धशतकं केली आहेत. त्याने लिस्ट ए च्या 64 सामन्यात 1950 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे.
हे देखील वाचा-