Mohammed Shami : टीम इंडियाने 2019 च्या वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीतील पराभवाचे उट्टे काढत न्यूझीलंडचा (Ind vs NZ) दणदणीत पराभव केला. भारताच्या या विजयात मोहम्मद शामीचा (Mohammed Shami) मोठा वाटा राहिला आहे. शामीने आपल्या तेज गोलंदाजीने किवींचे सात विकेट्स घेतले. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याला ज्या विश्वासाने चेंडू सोपवला, त्याच विश्वासाने शामीने कामगिरी फत्ते केली. शामीने आपल्या कारर्कीदीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले.
टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघासमोर 398 धावांचे भक्कम आव्हान उभे केले होते. या आव्हानाला सामोरे जाताना किवी संघाच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली. त्यानंतर रोहित शर्माने मोहम्मद शामीच्या हातात चेंडू सोपवला आणि त्याने सलामीवीर कॉनवे आणि रचिन रविंद्र तंबूत धाडले. डेवेन कॉनवे याला फक्त 13 धावा करता आल्या. रचिन रविंद्र यालाही मोठी खेळी करता आली नाही. रचिन रविंद्र याने 22 चेंडूत 13 धावा केल्या. 39 धावांत न्यूझीलंडचे दोन्ही सलामी फलंदाज माघारी परतले. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरेल मिशेल यांच्यात 171 धावांची भागिदारी झाली. या भागिदारीने सामना आता न्यूझीलंडच्या बाजूने झुकतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी 33 व्या षटकात शामीने दुसरा स्पेल टाकला. त्यावेळी त्याने एकाच षटकात विल्यमसन आणि टॉम लॅथम याला तंबूत धाडले.
शामीच्या या षटकाने सामना पुन्हा एकदा रंगत निर्माण केली. एका बाजूला मिशेल नांगर टाकून फटकेबाजी करत होता. तर, दुसरीकडे भारतीय गोलंदाजांचा चिवट मारा सुरू होता. त्याच्या परिणामी किवींना अपेक्षित धावगती राखण्यास यश मिळत नव्हते. शामीने आपल्या तिसऱ्या स्पेलमध्ये तीन विकेट्स घेतले. यामध्ये मिशेल, टीम साऊदी आणि लॉकी फॉर्ग्युसन यांचा समावेश होता.
यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट शामीच्या नावावर
मोहम्मद शामी यांच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज झालाय. शामी पहिल्या चार सामन्यात बेंचवर बसला होता. पण हार्दिक पांड्याला पुण्यातील सामन्यात दुखापत झाल्यानंतर शामीला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले. त्यानंतर त्याने माघारी पाहिले नाही. शामीने फक्त सहा सामन्यात 23 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये त्याने तीन वेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. तर एक वेळा चार विकेट घेतली आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात शामी पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर एडम झम्पा आहे. त्याने 22 विकेट घेतल्या आहेत.