India vs England, 4th Test Match : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे 23 जुलैपासून खेळवला जाणार आहे. लंडनमधील लॉर्ड्स मैदानावर खेळलेल्या तिसऱ्या कसोटीत भारताला 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे भारत सध्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत टिकून राहण्यासाठी आणि पुनरागमनासाठी भारतासाठी हा चौथा सामना ‘करो या मरो’चा ठरणार आहे. त्यामुळे कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वातील टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकते.

मोहम्मद सिराजला विश्रांती, अर्शदीप सिंहची एन्ट्री

सिराजने सलग तीन कसोटी सामने खेळले असून त्याचा वर्कलोड लक्षात घेता, त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्शदीपसाठी हा सामना त्याच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात ठरू शकतो.

करुण नायर आउट? साई सुदर्शनला दुसरी संधी?

मालिकेत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला करुण नायरला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्या जागी साई सुदर्शनला पुन्हा संधी दिली जाऊ शकते. पहिल्या कसोटीत साईला संधी मिळाली होती, पण तो प्रभाव पाडू शकला नव्हता. मात्र करुण नायर अपयशी ठरत असल्याने साईला पुन्हा आजमावण्यात काहीही हरकत नाही.

शार्दुल ठाकुरची पुनरागमन शक्यता कमी

शार्दुल ठाकुरचे पुनरागमन अद्याप शक्य वाटत नाही, कारण नितीश कुमार रेड्डीची गोलंदाजी समाधानकारक ठरली आहे. फलंदाजीत त्याचे योगदान मर्यादित असले तरी गोलंदाजीत त्याने विश्वास मिळवला आहे. पण चौथ्या कसोटीसाठी अजून वेळ आहे. आता गिलसेना काय रणनीती आखते आणि कोणते बदल निर्णायक ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संभाव्य भारतीय संघ (चौथा कसोटी सामना – मँचेस्टर)

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल,साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाशदीप, अर्शदीप सिंग.